नाल्यात कचरा टाकणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या; ३ लाखांचा दंड वसूल

Mumbai
action taken against people who throw garbage in drainage
नाल्यात कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई

पावसाळ्यात नालेसफाईचे काम करण्यात आल्यानंतरही पुन्हा नाल्यांमध्ये रहिवाशांकडून कचरा टाकला जात असून आजवर केवळ इशारा देणार्‍या महापालिकेने या कचरा टाकणार्‍यांनाच आपल्या जाळ्यात अडकवले आहे. महापालिकेने यासाठी गस्ती पथके तयार केली आहेत. कचरा टाकणार्‍यांकडून २०० रुपयांचा दंड वसूल केला जातो. मुंबईतील सर्व विभाग कार्यालयांमध्ये सुरु असलेल्या धडक कारवाईत सुमारे ३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे कचरा टाकणार्‍यांना पकडता यावे, यासाठी आता नाल्यांच्या कडेला संरक्षक लोखंडी ग्रील उभी केली जाणार आहे. ज्यामुळे कचरा नाल्यात फेकणारे महापालिकेच्या जाळ्यात अलगद पकडले जाणार आहे.

मुंबईतील नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक स्वच्छता असावी, यासाठी महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये गस्ती पथके तैनात करण्याचे आदेश देत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे या गस्ती पथकांमध्ये मुंबई पोलीसांचाही समावेश करून कचरा टाकणाऱ्यांवर ‘मुंबई पोलीस अधिनियम १९५१’ नुसार तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या सर्व विभागा कार्यालयांमध्ये गस्ती पथके तयार करून दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली. यानुसार आतापर्यंत रुपये २ लाख ९४ हजार ६०० एवढी दंड वसूली करण्यात आली आहे.

या कारवाईत सर्वाधिक म्हणजे ९३ हजार रुपये एवढी दंडाची रक्कम महापालिकेच्या ’एम पूर्व’ विभागातून अर्थात देवनार,गोवंडी, शिवाजीनगर आदी भागातून वसूल करण्यात आली. करण्यात आली आहे. त्या खालोखाल वरळी, लोअर परळ, वरळी कोळीवाडा, प्रेम नगर ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग या ‘जी दक्षिण’ विभागातून ३२ हजार ४०० एवढी दंडाची वसूली करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल कुर्ला ’एल’ विभागातून रुपये ३० हजार आणि कांदिवली ’आर दक्षिण’ विभागातून रुपये २४ हजार एवढी दंड वसूली करण्यात आली आहे.

ही कारवाई करताना नाल्यालगतच्या कोणत्या भागातून कचरा टाकण्यात आला आहे? हे शोधणे सुलभ होण्यासाठी नाल्यांमध्ये विशिष्ट अंतरानंतर ‘ग्रील’ बसविण्याची कार्यवाही सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या दृष्टीने जनजागृती व्हावी व नागरिकांचे सहकार्य मिळावे, यासाठी ठिकठिकाणी फलकदेखील बसविण्यात येत आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठकांचे आयोजन करण्यात येत असून स्वच्छता विषयक कार्यवाही प्रभावी होण्यासाठी त्यांचेही मार्गदर्शन घेतले जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.