रेल्वे परिसरात पतंग उडविणार्‍यांवर असणार नजर

मांजामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होण्याची शक्यता

रेल्वे परिसरात पतंग उडविणार्‍यांवर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून कारवाई करण्यात येणार आहे. पतंगाच्या मांजामुळे रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होऊन विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. त्यामुळे अशा पतंगबाजांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.

मुंबई उपनगरी रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून तब्बल 25 हजार व्होल्ट क्षमतेचा विद्युत प्रवाह वाहत असतो. इतक्या प्रचंड क्षमतेच्या विद्युतवाहिन्यांच्या स्पर्शानेच नव्हे, तर केवळ संपर्कात आल्यानेही विजेचा मोठा धक्का लागण्याची शक्यता असते. हा धक्का बसण्यासाठी ओव्हरहेड वायरला स्पर्श होण्याची गरज नसून, त्याच्या पाऊण मीटर परिघात पतंगाचा मांजा आल्यास त्यातूनही विद्युतप्रवाह वाहून विजेचा जबर धक्का लागण्याची शक्यता असते.

काही वर्षांपूर्वी बोरीवली येथे सात वर्षाचा मुलगा पतंग उडवताना विजेचा धक्का लागून जखमी झाला होता. तारांमध्ये अडकलेला मांजा व पतंग काढण्याच्या धडपडीतून अनेक वेळा दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या आवारात पतंग उडवू नयेत, असे आवाहन रेल्वेने केले आहे. मात्र, रेल्वे स्थानकालगत असणार्‍या झोपडपट्ट्यांमध्ये हा प्रकार सर्रास आढळून येतो. पश्चिम रेल्वेवर माहीम, वांद्रे, कांदिवली तसेच बोरीवली परिसरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी चालते.

रेल्वे परिसरात रेल्वेेचे जवान तैनात
पश्चिम रेल्वेच्या परिसरात पतंग उडविताना दिसले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक विभागात आरपीएफचे जवान तैनात असतील. त्यामुळे रेल्वे परिसरात पतंगबाजी करू नये असे आवाहन असे आमच्याकडून करण्यात येत आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त एस.आर गांधी यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ना दिली आहे.

मेटालिक पावडर कोटिंगपासून सावधान

पश्चिम रेल्वेने दिलेल्या जाहिर सूचनेमध्ये सांगण्यात आले की, काही धाग्यांना मेटालिक पावडर कोटिंग लावलेले असते. ज्यामुळे ट्रॅकवर तरतूद केलेल्या ओव्हरहेड उपकरणांच्या सान्निध्यात पतंग उडवितेवेळी,पंतग धाग्यांना स्पर्श होताच,जीवितहानी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, हाय व्होल्टेज ट्रॅक्शन 25000 व्होल्टस एसी असलेल्या रेल्वे ट्रॅक ओव्हरहेड उपकरणांच्या जवळून तेथून पतंग उडविणे किंवा पतंग काढणे टाळावे.