प्रवाशांना उचलून यमराजाच्या पाठीत उसण 

दुसर्‍या यमराजाला पाचारण

Mumbai

पश्चिम रेल्वेवर रेल्वे प्रवाशांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी यमराजाला पाचारण करण्याच्या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असले तरी रुळ ओलांडणार्‍या प्रवाशांना उचलून यमराजाच्या पाठीत उसण भरली. त्यामुळे यमराजाला सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे, अशी माहिती मिळाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नियमभंग करणार्‍या रेल्वे प्रवाशांना यमराज खांद्यावर उचलून बाजूला नेत आहे. पहिला यमराज हतबल झाल्यामुळे आता त्याच्या जागी दुसर्‍या यमराजाला पाचरण करण्यात येणार आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या उपनगरीय रेल्वे वाहतुकीत रेल्वे क्रॉसिंग ही गंभीर समस्या बनलेली आहे. रेल्वे प्रशासनासह रेल्वे पोलीस आणि सामाजिक संस्था ही समस्या सोडवण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. मात्र तरीसुध्दा प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात. यामध्ये बळी जाणार्‍या मुंबईकरांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांना रोखण्यासाठी आरपीएफ जवानांनी यमराजाची अभिनव कल्पना अस्तित्वात आणली. याच्या माध्यमातून रुळ ओलांडण्याची सवय किती धोकादायक असू शकते हे पटवून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ही विशेष मोहीम 6 नोव्हेंबर 2019 पासून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत माहीम, माटुंगा, दादर, मालाड आणि अंधेरी येथे ती राबविण्यात आली. मात्र यमराज रेल्वे रुळ ओलाडणार्‍या प्रवाशांना खांद्यावर उचलतो. पण आता ते त्याच्याच अंगाशी आले आहे. त्यामुळे त्याची पाठ आणि अंग खूप दुखत आहे.

कोण आहे हा यमराज
हा यमराज पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी आरपीएफ कार्यालयात कार्यरत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा जवान आहे. स्वप्नील होममाने असे त्याचे नाव आहे. स्वप्नील हा मूळचा जळगावचा आहे. आरपीएफने याला प्रशिक्षण देऊन यमराजाचा पेहेराव घालून जागृती मोहीम सुरू केली. त्याच्यासाठी यमराजाचा पेहराव भाड्याने घेण्यात आला. प्रतिदिवस 500 रूपये इतके या पोषाखाचे भाडे आहे.

यमराजाला आदेश
यमराज गेल्या तीन दिवसांपासून प्रवाशांना खाद्यांवर उचलत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तो चर्चेचा विषय ठरला. पण जेव्हा यमराजाच्या पाठीत उसण भरली यांची माहिती मिळली तेव्हा वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी त्याला प्रवाशांना उचलू नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता यमराज प्रवाशांना खांद्यावर उचणार नाही.

यमराजाच्या माध्यमातून रेल्वे रुळ ओलांडणार्‍या प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे करत असताना आम्ही या यमराजाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहोत. त्याला कसल्याही प्रकारची उसण भरलेली नाही. विशेष म्हणजे या यमराजाला विश्रांती मिळावी म्हणून दुसरा यमराज त्याच्या जागी आणण्यात येणार आहे.
– जे.पी. मिना, पोलीस निरीक्षक, आरपीएफ, दादर