घरमुंबईअदाणी वाढीव वीजबिल प्रकरणाची होणार चौकशी

अदाणी वाढीव वीजबिल प्रकरणाची होणार चौकशी

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी उर्जामंत्र्यांना दिले आदेश

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने उपनगरातील मुंबईकरांना दिलेल्या वाढीव बिलाच्या प्रकरणात आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातले आहे. वाढीव वीजबिलासंदर्भात नागरिकांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेऊन मुंख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी वीजमीटर रिडिंगच्या घोळाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वीज ग्राहकांची कैफियत मांडली. मुंबई उपनगरातील ग्राहकांच्या वीजबिलाच्या प्रकरणी समितीची नेमणूक करून राज्याच्या वैधमापन विभागाकडून ऑडिट करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. चुकीच्या मीटर रिडिंग पाठवून अदानीने कोट्यवधी रुपयांची वसूली केल्याचे आशीष शेलार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. वीज बिलात ५० ते १०० टक्के इतकी वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी येत आहेत. सरासरी वीजबिल देण्याचे प्रकार तीन महिन्यांपासून होत असल्याचेही शेलार यांनी पत्रात नमुद केले आहे.

- Advertisement -

वीज मीटर रिडिंगच्या तक्रारी पाहता तीन महिन्यातील वीजबिलाचे रिडिंग प्रक्रियेचे ऑडिट करण्याची मागणी शेलार यांनी केली. सरासरी वीजबिल दिल्याची किती प्रकरणे आहेत याची माहिती अदाणीने द्यावी असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. ग्राहकांना वीजबिल दुरूस्ती करून तत्काळ परतावा द्यावा असेही पत्रातून सुचवले आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी वैध मापन विभागाला अधिकार द्यावेत आणि वेळोवेळी तपासणीसाठी सक्षम करावे असेही मत शेलार यांनी मांडले आहे. मुंबईकरांचा हा विषय सोडवण्यासाठी तज्ज्ञ समिती, ग्राहक प्रतिनिधींचा समावेश असलेली समितीही नेमावी असेही शेलार यांनी सुचवले आहे.

अदाणीमार्फत १५ दिवस कॅम्प
अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने ग्राहकांच्या वीजबिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी आठ ठिकाणी कॅम्प सुरू केला आहे. कांदिवली, भाईंदर, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, साकीनाका, गोरेगाव आणि टिळक नगर येथे ग्राहक सेवा केंद्राकडून वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवल्या जाणार आहेत. रविवार वगळता दररोज १० ते ५ या वेळात या तक्रारी १५ डिसेंबरपर्यंत निवारण करण्यात येईल, असे एईएमलच्या प्रवक्त्यांनी सांगितले. ग्राहकांना [email protected] या ईमेल आयडीवर व १९१२२ या क्रमांकावरही तक्रार करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -