अगोदर नोटीसनंतर अतिरिक्त अभ्यासक्रम

Mumbai
mumbai university
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठातील अनागोंदी कारभार हा विद्यार्थ्यांना काही नवीन नाही. मात्र या भोंगळ कारभाराविरोधात आता विद्यार्थ्यांनंतर प्राध्यापकांनीच याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. शहापूर येथील सोनाभाऊ पंत कॉलेजाच्या गैरप्रकाराची चौकशी सुरु असतानाच या कॉलेजला अतिरिक्त अभ्यासक्रमासाठी मंजुरी दिल्याची प्रकार मुक्त्ता या प्राध्यापक संघटनेने समोर आणला आहे. विशेष म्हणजे, संघटनेने याविरोधात कुलसचिवांना कल्पना दिल्यानंतरही मुंबई विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने यावरुन नवा वादंग उभा राहणार आहे. याविरोधात आता संघटनांनी कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकरांना यांना लक्ष्य केले आहे.

शहापूर येथील सोनुभाऊ बसवंत कला, वाणिज्य कॉलेजने शिक्षक भरती मध्ये केलेल्या गैरप्रकारासंबंधी मुक्ता शिक्षक संघटनेने गेल्या अनेक दिवसांपूर्वी तक्रारी केलेल्या होत्या. भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराच्या मुलाखतींचे अहवाल पाठविण्याची सूचना ही विद्यापीठाकडून करण्यात आली होती. मात्र अद्याप या मुलाखतीचे अहवाल महाविद्यालयाने गेल्या एक वर्षांपासून विद्यापीठाला पाठवलेले नाहीत आणि त्या प्राध्यापकाची नियुक्ती देखील केलेली नाही. मुख्य म्हणजे, या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर विद्यापीठाने कॉलेजला तीन पत्रे पाठविली त्याला देखील कॉलेजने केराची टोपली दाखवली. शेवटी व्यवस्थापन परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित केल्यानंतर कॉलेजला तुमची संलग्नता रद्द करण्याविषयी कारवाई करण्यात येईल अशी नोटीस देखील पाठविली.

मात्र या नोटीसीला ही कोणतीही उत्तर कॉलेजकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली होती. या समितीने कॉलेजला भेट देत कॉलेज प्रशासनाला अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. याकडे ही कॉलेजप्रशासनाने कानाडोळा केला असल्याचा आरोप मुक्त्ता या प्राध्यापक संघटनेने केला आहे. एकीकडे कॉलेज मुंबई विद्यापीठाचे कोणतेही आदेश जुमानत नसताना या कॉलेजला नव्याने अतिरिक्त अभ्यासक्रम सुरु करण्याची परवानगी विद्यापीठाने दिली आहे. त्यामुळे प्राध्यापकांसह विद्यार्थी संघटनांनी देखील याविरोधात नाराजी व्यक्त केली असून याप्रकरणी कॉलेज प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याप्रकरणाबद्दल बोलताना मुक्त्त विद्यापीठाने महासचिव सुभाष आठवले म्हणाले की, मुळात कॉलेज प्रशासनाच्या कारभाराविरोधात आम्ही काही दिवसांपूर्वीच कुलसचिवांकडे तक्रार केली होती. त्याची कोणतीही दखल कॉलेज प्रशासनाने घेतली नाही. याउलट आम्ही या कॉलेजची संलग्नता रद्द करण्याविषयी मागणी केली होती. त्यानंतर कॉलेजला वाढीव कोर्स मागण्याची समिती गठीत करुन ही अतिरिक्त अभ्यासक्रम मंजूर करण्यात आला आहे. विद्यापीठांच्या कुलसचिवांना यांचा पूर्व इतिहास पहाता त्यांची मनमानीपणा या विद्यापीठात देखील चालू आहे. कुलगुरू डॉ. पेडणेकर यांनी अशी कामे करण्यासाठी त्यांना नेमले असेल तर हे फार दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here