घरमुंबईआदित्य गिरणगावातून विधानसभेत!

आदित्य गिरणगावातून विधानसभेत!

Subscribe

वरळी पहिली पसंती, शिवडीच्या मराठी मतांवरही नजर

साठच्या दशकात कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या हत्येनंतर शिवसेनेचा दबदबा वाढला. त्याच गिरणगावात सेनेच्या सर्वेसर्वा असलेल्या ठाकरे कुटुंबातील तिसरी पिढी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. रिमोट कंट्रोलने पाच दशके सत्ता चालवणार्‍या ठाकरे परिवारातील युवराज आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत पोहचण्यासाठी गिरणगावाची निवड केली आहे. त्यात प्रामुख्याने शिवडी आणि वरळी हे दोन मतदारसंघ येतात आणि ते दोन्ही सेनेचे मजबूत गड समजले जातात.

लोकसभेच्या निवडणुका दमदाररित्या जिंकल्यावर भाजपा-सेना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री मोर्चेबांधणीला लागलेत तर सेनेकडून ठाकरेंच्या तिसर्‍या पिढीने संसदीय मैदानात उतरण्यासाठी हीच उत्तम वेळ असल्याने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येणार्‍या विधानसभा निवडणुकीत गिरणगावातून शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. गेली पाच दशके सेनेचा दबदबा ज्या गिरणगावात निर्माण झाला तो प्रामुख्याने नायगाव, परळ, लालबाग, शिवडी, लोअर परळ आणि वरळी परिसराचा समावेश आहे. हा भाग मुख्यतः शिवडी आणि वरळी विधानसभा मतदारसंघात येतो. ह्या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे अजय चौधरी आणि सुनिल शिंदे हे आमदार आहेत. विशेष म्हणजे दोघांनीही हाडाचे शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरवले आहेत . यापैकी अजय चौधरी यांच्यावर उध्दव ठाकरेंची विशेष मर्जी आह

- Advertisement -

तीन पिढ्या राजकारणात असलेल्या ठाकरे परिवारातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब,पक्षप्रमुख उद्धव आणि युवासेना प्रमुख आदित्य यांच्या राजकारणाचा पोत पूर्णत: भिन्न आहे. बाळासाहेब आणि त्यानंतर उध्दव यांनी संसदीय राजकारणात न उतरताही संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर रिमोट कंट्रोलद्वारे आपला वचक ठेवला. येणार्‍या काळात बदलत्या संदर्भानुसार पक्षावर ठाकरे कुटुंबाचेच नियंत्रण ठेवण्यासाठी युवा पिढीला आपलं नाणे खणखणीत असल्याचे दाखवून द्यावे लागेल. त्यामुळेच आदित्य यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय पुढे आला आहे.

दुसर्‍यांदा मोदींना मिळालेलं घवघवीत यश पाहता भाजपशी युती ठेवूनच गिरणगावातील सुरक्षित मतदार संघातून निवडणूक लढवण्यास आदित्य इच्छुक आहेत. यापैकीच्या शिवडी मतदार संघात सगळे सेनेचे नगरसेवक आहेत तर वरळी मतदार संघ राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांच्याकडून सुनिल शिंदे यांनी खेचून घेतल्यानंतर हा आता सेनेचा हुकमी मतदार संघ झालाय, तिथेही सगळे सेनेचेच नगरसेवक आहेत. या भागातील शिवसैनिक अधिक आक्रमक आणि ध्येयवेडा होतो.

- Advertisement -

२००५ साली नारायण राणेंना पक्षातून काढून टाकल्यावर त्यांच्या समर्थकांशी त्याच पद्धतीने टक्कर देण्यासाठी वरळीच्या शिवसैनिकांनी सर्वात आधी आघाडी घेतली होती. त्यामुळे वरळी ही ’मातोश्री’ची पसंद ठरु शकतो. शिवाय आदित्य यांच्या निवासस्थानातून बाहेर पडून राजीव गांधी सागरी सेतू पार केल्यावर लगेचच वरळी विधानसभा मतदारसंघ लागतो. भौगोलिकदृष्टया हा मतदारसंघ आदित्य यांच्या अधिक घराशेजारी आहे. यापैकी शिवडी मतदार संघात लोकसभेला सेनेला ४९ हजारांचे मताधिक्य आहे. वरळीत हीच संख्या ३७, ९४३ इतकी आहे. या मतदारसंघात भाजपाची साधारण २८ हजार मते आहेत, तर सुमारे १५ हजार दलित मते आहेत. मात्र हा भाग झपाट्याने विकसित होत असून तिथला बहुभाषिक मतदार हा मुद्दाही. महत्वाचा आहे. हीच गोष्ट शिवडी मतदार संघात मराठी टक्कयामुळे सेनेच्या पथ्थ्यावर पडणारी आहे.
अनुभव कामाला आला

बाळासाहेब आणि उध्दव ठाकरे हे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणापासून जाणीवपूर्वक लांब राहिले. आदित्य मात्र एखादी निवडणूक अंगावर घेऊन लढण्यात खूपच उत्साही असतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या १५१ जागांवरुन युवराजांची गल्लत झाली आणि त्याची किंमत सेनेला मोजावी लागली. त्यानंतर मात्र डोके खांद्यावर ठेवून लढलेल्या सिनेटच्या निवडणूकीत आदित्य यांच्या युवासेनेला दणदणीत यश मिळालं. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती आदित्य यांनी टाळली. म्हणूनच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आदित्य यांनी सगळ्यात कठीण असलेल्या दक्षिण मुंबईत अक्षरशः तळ ठोकून अरविंद सावंत यांच्या यशात त्यांचा मोठा वाटा उचलला.
अनेक मतदारसंघातून मागणी

आदित्य यांच्या निवडणूक लढण्याची कल्पना पुढे आल्यावर अनेक मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारीला मागणी होऊ लागली. मात्र मातोश्रीवरील चाणक्यांनी सर्वाधिक पसंती वरळी आणि शिवडीला दिली आहे. त्यानंतर ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या वांद्र्याच्या खेरवाडीचा विचार ही होऊ शकतो. मात्र मोठ्या आघाडीने जिंकल्यास पक्षात आणि मित्र पक्षात अधिक आदराची भावना निर्माण होण्यास मदत होऊ शकते त्यामुळे सुरक्षित गिरणगावाला पसंती दिली जाणार आहे. म्हणूनच शिवडी मतदार संघाचा प्राधान्याने विचार सुरू आहे. या भागातील युवासेना अधिक आक्रमक आहे त्याचा फायदा छोट्या ठाकरेंना होऊ शकतो. यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आदित्य यांना टक्कर देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार विरोधकांकडे नाही.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी १९ जूनला निर्णय
आदित्य यांच्या विजयासाठी नव्हे तर विक्रमी आघाडीसाठी स्थानिक पदाधिकारी , युवासेना घाम गाळणारच आहेत,मात्र प्रत्येक घामाचा थेंब कारणी लागतोय की नाही हे पाहण्यासाठी ’मातोश्री’ने कालच्या आणि आजच्या अश्या दोन पिढीतील अत्यंत विश्वासू ’चाणक्यांवर’ युवराजांच्या विजयाची जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या म्हणजे येत्या १९ जूनला यावर अधिकृत मोहोर उमटवली जाईल, असे सेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

या शिवसेना नगरसेवकांमुळे होणार फायदा
वरळीतील नगरसेवक : १.हेमांगी वरळीकर- उपमहापौर, २.समाधान सरवणकर, ३.संतोष खरात,४.आशिष चेंबूरकर,
५.दत्ता नरवणकर, ६.स्नेहल आंबेकर, ७.किशोरी पेडणेकर.
शिवडीतील नगरसेवक : १.श्रध्दा जाधव, २.सिंधु मसुरकर, ३.अनिल कोकीळ, ४.दत्ता पोंगडे, ५.सचिन पडवळ

तीन चाणक्यांच्या खांद्यावर जबाबदारी
शिवसेना-भाजपची युती होण्यासाठी शिवसेनेच्या ज्या तीन चाणक्यांनी पडद्यामागून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली त्या शिवसेना नेते सुभाष देसाई, सचिव अनिल देसाई आणि सचिव मिलींद नार्वेकर यांच्याकडे आदित्यला निवडून आणण्याची जबाबदारी आहे. सोपवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -