घरमुंबईएचआर, जयहिंद, केसी कॉलेजमध्ये एडमिशन घोटाळा

एचआर, जयहिंद, केसी कॉलेजमध्ये एडमिशन घोटाळा

Subscribe

प्रवेश प्रक्रियेची प्रसंगी चौकशी करणार - शिक्षणमंत्री

एचआर, जयहिंद आणि केसी कॉलेजमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कोट्यावर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देत आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विऱोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केला. शिक्षण उपसंचालकांना हाताशी धरून गेल्या तीन वर्षात हा गैरव्यवहार झाल्याचा ते म्हणाले. त्यावर या प्रकरणी गरज पडल्यास चौकशी करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिले.

यावेळी मुंडे यांनी मागील तीन वर्षांतील प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी सभागृहात मांडली. अकरावी प्रवेश प्रक्रियेनुसार ज्या जागांसाठी प्रवेश होत नाहीत अशा जागा संस्था किंवा महाविद्यालये यांनी सरेंडर करणे अपेक्षित आहे. पण गेल्या तीनही वर्षात जागा सरेंडर न करता शिक्षण उपसंचालकांच्या मदतीने लाखो रूपयांचा व्यवहार करत या जागा इतर विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत, असे मुंडे म्हणाले. मुंबईतील अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांकरीता 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.या 50 टक्केे राखीव जागांवर प्रवेश देण्याचे अधिकार संस्था व संबंधित महाविद्यालयास आहेत.

- Advertisement -

संबंधित अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात येतो. अल्पसंख्यांक कोट्यातील राखीव असलेल्या जागांमधून प्रवेश झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये स्वेच्छेने सरेंडरची तरतूद आहे. पण सरेंडर केलेल्या जागेवर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधून प्रवेश दिलेला आहे असे उत्तर यावेळी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिले. पण कोणताही भ्रष्टाचार किंवा आर्थिक गैरव्यवहार झाला असेल तर सरकार कडक भूमिका घेऊन गरज पडल्यास कारवाई करेल असेही आश्वासन शेलार यांनी सभागृहात दिले.

एचआर, केसी आणि जयहिंद महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी चर्चा झाली आहे. संपूर्ण माहिती घेऊन गरज पडल्यास चौकशीही करू, मात्र जर या प्रकरणात कुणीही कोर्टात गेले, तर मात्र संपूर्ण ऑनलाईन एडमिशन प्रक्रियेला स्थगिती मिळेल, असे शिक्षणमंत्री अ‍ॅड. शेलार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -