घरमुंबईप्रकरण मिटवण्याचा सल्ला नडला

प्रकरण मिटवण्याचा सल्ला नडला

Subscribe

सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे आयुक्तांकडून निलंबन

 बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यासाठी आलेल्या तरुणीची तक्रार न घेता तिला नैतिकतेचे धडे देऊन पैशांचे आमिष दाखवून आरोपी व पीडित तरुणी यांच्यात तडजोड करण्याचा व प्रकरण मिटविण्याचा सल्ला देणार्‍या खारघर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव यांना पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी चांगलाच दणका दिला आहे.त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून निलंबनाच्या कारवाईनंतर जाधव यांना पोलीस आयुक्तालयात दरदिवशी हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त

सेच, त्यांना खासगी कामासाठी पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर जायचे असल्यास आयुक्त कार्यालयात आगाऊ सूचना देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांना अपमानस्पद वागणूक देणे,त्यांचे ऐकून न घेणे व मनमानी कारभार करणे यासह अनेक कारणांनी खारघर पोलीस ठाणे बदनाम असून पोलीस ठाण्यातील अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत.त्यातच जाधव यांचा प्रकार समोर आल्याने या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करतात काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

अंधेरी येथे राहणारी ३० वर्षीय पीडित तरुणी रविवारी रात्री खारघरमध्ये राहणार्‍या मैत्रिणीच्या घरी पार्टीसाठी आली असताना, ती दारूच्या नशेत असल्याची संधी साधून तिच्यासोबत कंपनीत कामाला असणार्‍या श्रीजीत जॉन याने लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणी दुसर्‍या दिवशी खारघर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी गेली असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल न करता, केवळ साधी दुखापत, शिवीगाळ व दमदाटी केल्याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यामुळे पीडित तरुणीने मुंबईतील वकिलामार्फत पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे तक्रार केली होती.

पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खारघर पोलिसांनी आरोपी श्रीजीत जॉन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पनवेलच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी केलेल्या चौकशीत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव यांनी बलात्कारासारख्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचे तसेच अदखलपात्र गुन्हा दाखल करून गुन्ह्याचे स्वरूप कमी केल्याचे आढळून आले. तसेच, जाधव यांनी पीडित तरुणीला पैशांचे आमिष दाखवून आरोपी व पीडित तरुणी यांच्यात तडजोड करण्याचा व प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यानंतर त्यांनी याबाबतचा अहवाल पोलीस आयुक्तांना दिला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -