घरमुंबईअखेर चार महिन्यांनी खुनाचा पर्दाफाश

अखेर चार महिन्यांनी खुनाचा पर्दाफाश

Subscribe

दुसरा गुन्हा केल्यानंतर आरोपीला अटक

हॉटेल व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मुलुंडमधील नवघर पोलिसांना तब्बल ४ महिने लागले आहेत. या चार महिन्यांच्या कालावधीत आरोपीने आणखी एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यातून बचावलेल्या व्यक्तीमुळे पहिल्या खुनाचा छडा लागला असून पोलिसांनी हॉटेलात चहा बनवणार्‍याला अटक केली आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी, मृत इसम आणि जखमी इसम एकाच हॉटेलात काम करणारे आहेत. या दोन्ही घटना क्षुल्लक कारणावरून घडलेल्या होत्या, परंतु जानेवारीत खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांचा तब्बल ४ महिन्यांचा कालावधी लोटला होता.

विजयकुमार यादव असे ओळख पटलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. विजय कुमार याचा मृतदेह जानेवारी महिन्यात मुलुंड पूर्व येथील केळकर कॉलेज इमारतीच्या मागे असलेल्या झुडुपात मिळून आला होता. डोक्यात जड वस्तूने प्रहार करून विजय कुमार याची हत्या केली होती. त्यानंतर मारेकर्‍याने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. या जाळपोळीत विजय कुमारचा संपूर्ण चेहरा जळाल्यामुळे त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली. पोलिसांनी तब्बल ४ महिने मुंबई तसेच मुंबई बाहेरील पोलीस ठाणे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पायपीट करूनही मृतदेहाची ओळख पटत नव्हती.

- Advertisement -

या दरम्यान एप्रिल महिन्यात केळकर कॉलेजच्या पाठीमागे त्याच ठिकाणी आणखी एका नेपाळी व्यक्तीवर अशाच प्रकारे हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, या हल्ल्यात जखमी झाल्याचे नाव नवराज रेगमी (३०) असल्याचे पोलिसांना कळाले. हा गुन्हा त्याचाच सहकारी योगेश राणे याने केल्याचे उघड झाले होते. नवघर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चेंबूर घाटला येथून योगेश राणेला अटक केली होती.

योगेश राणे आणि जखमी नवराज रेगमी हे दोघे मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ असणार्‍या विश्वभारती या हॉटेलात कामाला होते. योगेश हा हॉटेलमध्ये चहा बनवण्याचे काम करीत होता तर नवराज हा टेबल बॉय म्हणून काम करीत होता. या हॉटेलमध्ये टेबल बॉय म्हणून काम करणारा विजय कुमार यादव हा जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. घटनास्थळ,तसेच दोन्ही गुन्ह्यातील मारण्याच्या पद्धतीवरून जानेवारीत मिळून आलेला मृतदेह विजयकुमार याचा असावा या संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरु केला.

- Advertisement -

विजयकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशचा असल्यामुळे त्याच्या भावाला पोलिसांनी मुंबईत बोलावून घेतले.मृतदेहाचे आणि विजयकुमार याची डीएनए चाचणी करण्यात आली.अखेर गेल्या आठवड्यत डीएनएचा अहवाल पोलिसांच्या हाती आला असता विजयकुमारच्या भावाची आणि मृतदेहाचे डीएनए जुळले आणि मृदेहाची ओळख पटली. पोलिसांनी या प्रकरणी योगेश राणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन न्यायालयीन कोठडीत असलेल्य योगेशला विजयकुमारच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

हॉटेलात काम करणारा नोकर गुढरित्या बेपत्ता होऊनही हॉटेल व्यवस्थापकाने त्याची गंभीर दखल न घेता पोलीस ठाण्यात साधी तक्रार देखील दाखल केली नव्हती, याबाबत व्यवस्थापक विनायक गावडे याच्याशी चर्चा केली असता आमच्याकडे दररोज अनेक कामगार येतात, त्यांना पटले नाही तर ते काम सोडून निघून जातात विजयकुमार देखील तसाच काम सोडून गेला असेल म्हणून आम्ही तक्रार केली नाही, असे गावडे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

ओळख पटवण्यासाठी चेहर्‍याची पुनर्निर्मिती

मार्च महिन्यांत नवघर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी केईएम हॉस्पिटलमधील ऑस्टिओलॉजी विभागाची मदत घेतली. तेथील डॉक्टरांनी मृत इसमाच्या चेहर्‍याची पुनर्निर्मिती करून त्या व्यक्तीचा चेहरा पूर्वीच्या चेहर्‍याशी मिळता जुळता तयार केला होता. मात्र तरीही मृताची ओळख पटत नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -