महावितरणच्या खासगीकरणाच्या विरोधात आता शिवसेनेची उडी

Mumbai
mahavitaran
Mahavitaran

सध्या महावितरणकडे पुरेसा वीजसाठा असला तरी वाढीव मागणीचा परिणाम हा विद्युत व्यवस्थेवर होत आहे. याला जबाबदार वीज चोरी असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. मात्र या प्रकारावर कायमस्वरुपी कोणतीही ठोस उपाययोजना महावितरण करत नाही. केवळ वीजचोरीमुळे येथील वीज प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केलेले नसून याला अनेक इतर कारणे असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र यावर पर्याय म्हणून महावितरणने शीळ, मुंब्रा आणि कळवा या परिसराच्या वीज वितरणाचे काम पुढील वीस वर्षांकरिता टोरेंट पॉवर कंपनीला देण्याचे निश्चित केले आहे. या विरोधात राष्ट्रवादीसह आता शिवसेनेनेही दंड थोपटले आहेत.

कळवा-खारेगाव येथील वीज वितरण कंपनीच्या टोरंटो कंपनीला दिलेला ठेका राज्य शासनाने रद्द करावा. अन्यथा वीज मंडळाच्या कार्यालयाला सील ठोकू, असा इशारा शिवसेना उपनेते दशरथ पाटील आणि ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील यांनी दिला आहे. तर कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी मुंब्रा, दिवा, शिळ, देसाई विभागातील विद्युतीकरणाच्या खाजगीकरणाला तीव्र विरोध करून टोरंटो पॉवर कंपनीला दिलेला लेटर ऑफ इंटरेस्ट तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

कळवा, मुंब्रा या भागातील विजेची तूट मागील वर्षी ३१ टक्के होती, ती यावर्षी २५ टक्क्यांवर आली आहे. जी बिले ग्राहकांना मिळतात, त्यापैकी ९५ टक्के ग्राहक रितसर बिले भरतात. या भागातील ९० हजार ग्राहकांपैकी १२ हजार ग्राहकांकडील वीज मीटर नादुरूस्त आहेत. तूटका येते याची कारणे न शोधता या भागातील वीज वितरण यंत्रणेचे खाजगीकरण करून कळवा आणि खारेगाववासींवर अन्याय केला जात आहे. टोरंटो कंपनीने भिवंडी येथे मीटरमध्ये घोटाळा केला हे सर्वश्रूत आहे. तरीही टोरंटो कंपनीला खाजगीकरणाचा ठेका दिल्यामुळे याला आमचा कायम विरोध असेल, अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे. दिवा शिळ, देसाई कळवा विभागात लाखोंची ग्राहक संख्या असून या विभागातील नागरिक खाजगीकरण होणार असल्याने संभ्रमात आहेत. अचानक खाजगीकरण होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

टोरंटो कंपनीने भिवंडी येथे मीटरमध्ये घोटाळा केला हे सर्वश्रूत असताना खाजगीकरणाद्वारे या कंपनीचा ठेका जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल. त्यामुळे या कंपनीचा ठेका रद्द करावा. अन्यथा वीज वितरण कंपनीला सील ठोकू.
– उमेश पाटील, नगरसेवक, ठाणे महापालिका

दिवा-शिळ, देसाई, मुंब्रा कळवा विभागातील नागरिकांना महावितरणच्या खाजगीकरणासंबंधी कोणतीही पूर्वसूचना अथवा विश्वासात न घेता केल्यास नागरिक कंपनी तसेच प्रशासनाच्या पूर्णपणे विरोधात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मुंब्रा, दिवा, शिळ, देसाई विभागातील वीज ग्राहकांच्या भावना लक्षात घेता या खासगीकरणाला तसेच टोरंटो पॉवर कंपनीला दिलेला लेटर ऑफ इंटरेस्ट अन्यायकारक असून ताबडतोब रद्द करण्याची मागणी मी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.
– सुभाष भोईर, आमदार

टोरंटो ही चोर कंपनी आहे. वाढीव बिले देऊन नागरिकांना तीन-तीन महिने तुरुंगात डांबण्याचा अमानुष प्रकार या कंपनीने भिवंडीमध्ये केला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास देणार्‍या या वीज वितरण कंपनीला कळवा- मुंब्रा भागात पाऊल ठेऊ देणार नाही, सर्वात आधी या खासगीकरणाला आम्हीच विरोध केला होता. आता इतर राजकीय पक्षही आमचीच भूमिका मांडत आहेत.
– जितेंद्र आव्हाड, आमदार, ठाणे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here