घरमुंबईआगरी सेना मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखणार

आगरी सेना मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखणार

Subscribe

महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिलामध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अशा अनेक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जावे या करता हे आंदोलन केले जाणार आहे.

तुंगारेश्वर पर्वतावरील आगरी-कोळी भूमिपुत्रांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र परशुराम कुंड, पारोळकडून येणारा ग्रामीण मार्ग क्र. २५० आणि सातिवलीकडून येणारा मार्ग क्र. ८७ हे दोन्ही रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी केल्या अनेक वर्षापासून होत आहे. मात्र या प्रलंबित मागणीकडे जाणीवपूर्वक चालढकल केली जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या अनेक मागण्यांना शासन केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप करीत या विरोधात आगरी सेना मुंबई – अहमदाबाद महामार्ग रोखणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ शिरसाड नाका या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती आगरी सेना नेते कैलास पाटील यांनी दिली. यावेळी आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्यासह भुपेश कडुलकर, चेतन गावंड, प्रशांत पाटील राहूल साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विविध प्रकल्पात भूमिपुत्रांना तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे. इतर शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पीक नुकसान झाले असता भरपाई मिळते त्याप्रमाणे मागील दोन महिने ओएनजीसीने सर्व्हेक्षणाकरिता मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तेव्हा या बंदीच्या काळात मच्छिमार कोळी समाजाला देखील नुकसान भरपाई मिळावी. मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा महामार्ग आणि विरार-अलिबाग कॉरिडोअर या प्रकल्पांत बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला अद्यापही मिळालेला नाही. तसेच महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिलामध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अशा अनेक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जावे या करता हे आंदोलन केले जाणार आहे. शासनाने वेळीच या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा संपूर्ण जिह्यात ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -