विरोधकांची घोषणाबाजी पाहून अजितदादांनाही आठवली ‘पायरी’!

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी देण्याच्या निषेधाचा खोचक शब्दांमध्ये समाचार घेतला आहे.

Mumbai
ajit pawar on opposition protest

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. मात्र, पहिल्याच दिवसापासून विरोधी पक्षांत असलेल्या भाजप आणि इतर पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकरी कर्जमाफी, हेक्टरी २५ हजारांची मदत आणि महिला सुरक्षा या मुद्द्यांवरून अधिवेशनात स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी करत विरोधकांनी आक्रमक व्हायला सुरुवात केली आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विधानसभा आणि विधानपरिषदेतल्या विरोधी आमदारांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. मात्र, घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्य स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना आंदोलन करणाऱ्या विरोधकांना खोचक टोला लगावला. ‘खरंतर भाजपनं आंदोलन करण्याचं काहीच कारण नव्हतं. कालपासून शेतकऱ्यांसाठीच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा शुभारंभ झाला आहे. पैसे थेट शेतकऱ्यांच्या लोन अकाऊंटला जमा होत आहेत. ६ तारखेला आम्ही अर्थसंकल्प सादर करत आहोत. ज्या काही बाबी जनतेसाठी करायच्या आहेत, त्यासाठी आम्ही कामाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याआधी कर्जमाफीची वेगळी तारखी घेतली होती. पण त्यावेळी बहुतेक सुट्टी आली. त्यामुळे त्यांनी आजची तारीख नक्की केली. पण विरोधकांचं म्हणाल तर अधिवेशन असतं, तेव्हा विरोधकांना अशी आंदोलनं करावी लागतात. मोर्चे काढावे लागतात. जनतेच्या प्रश्नांवर आपण काहीतरी करतोय, आपल्याला त्याचं महत्त्व आहे, हे दाखवण्यासाठी हे करावं लागतं. आम्हीही विरोधात असताना मोर्चे काढायचो, पायरीवर बसायचो. काल ते पायरीवर बसले, तेव्हा आम्हाला आमचे दिवस आठवले. घोषणा देताना कसे घसे कोरडे व्हायचे, कोण गोळ्या द्यायचं, कोण काय करायचं’, हे सगळं मला आठवलं’, असं अजित पवार म्हणाले.

कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्याचं अजितदादांना आमंत्रण! Dy CM Ajit Pawar Speaks on Farmers Loan Waiver

कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्याचं अजितदादांना आमंत्रण! Dy CM Ajit Pawar Speaks on Farmers Loan Waiver

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 25, 2020

‘२-३ महिन्यांत योजना पूर्ण’

दरम्यान, यावेळी अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीच्या योजनेविषयी माहिती दिली. ‘शेतकरी कर्जमाफीची योजना २ ते ३ महिन्यांत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. कर्जमाफी आणि त्यानंतर जमा होणारे पैसे यासाठीची सिस्टीम व्यवस्थित चालते का? हे आम्ही पाहात होतो. एकदम सगळ्यांची यादी जाहीर केली, तर समस्या येऊ शकते. त्यामुळे ट्रायल बेसवर दोन दोन गावं घेतली आहेत. पण आता पुढच्या याद्यांचं काम सुरू झालेलं आहे’, असं ते म्हणाले.


हेही वाचा – विधानसभा सुरू होताच विरोधकांचा गोंधळ, काम होऊ देईनात!