घरमुंबईठाणे संपूर्ण बंद

ठाणे संपूर्ण बंद

Subscribe

लोकांचा स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद,

करोना व्हायरसचा धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला रविवारी ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्यासह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, भिवंडी, कर्जत कसारा आदी परिसरात लोकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. लोकांनी घरी राहणे पसंत करीत, बंदला भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानक आणि रस्त्यावर सन्नाटा पसरला होता. ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलीस तैनात होते. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांकडून ओळखपत्राची तपासणी करून स्टेशवर सोडले जात होते. अत्यावश्यक सेवेवरील कर्मचारी सोडून सामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. लोकलही रिकाम्या धावत होत्या. रेल्वे फलाटावरही रेल्वे पोलीस गस्त घालीत होते.

नेहमीच प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेले रेल्वे स्थानकावरही शुकशुकाट पसरला होता. फलाटावर ठाण मांडून बसणारे भिकारी, गर्दुल्ले आणि तृतीयपंथी हे सुध्दा नव्हते. रेल्वे स्थानकात येणार्‍याची व रस्त्यावर फिरणार्‍यांची पोलिसांकडून चौकशी केली जात होती. तसेच शहरातील मेडीकल वगळता सर्वच दुकाने, बाजारपेठा आणि रिक्षा, बसेस बंद असल्याने रस्त्यावर शुकशकाट पसरला होता. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची बस सेवा पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, परिवहन व एसटी आगारातून एकही बस सोडण्यात आली नव्हती. त्यामुळे बस आगारात सामसूम पसरली होती. नवी मंबई आणि केडीएमसीची परिवहन सेवाही बंद होती, खासगी बसेसही पूर्णपणे बंद होत्या. ठाण्यातील नौपाड्यातील गोखले रोड राम मारूती रोड आणि स्टेशन परिसरातील सर्वच दुकानदारांनी बंदला प्रतिसाद दिला. तसेच कोपरी वागळे इस्टेट कॅडबरी जंक्शन नितीन कंपनी घोडबंदर आदी परिसरातील हॉटेल बार रेस्टॉरंट लॉक डाऊन होते. तसेच ठाणे शहरातील ब्युटी पार्लर आणि स्पा केशकर्तनालय मंगल कार्यालये सगळयांनीच स्वंयस्फूर्तीने बंद केले हेाते. नेहमीच गजबजणारे जिल्हाधिकारी कार्यालय व टेंभीनाका परिसरात सामसूम पसरली होती. सकाळी दुध डेअरी बंद असल्याने दुधही मिळाले नाही. रविवारी जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शनिवारीच बाजारहाट केला होता व अत्यावश्यक वस्तू आणल्या होत्या.

- Advertisement -

शहरातील सर्वात मोठं रिक्षा स्टॅन्ड ओळखले जाणारे वागळे इस्टेट परिसरातील साठे नगर येथे सगळया रिक्षा पार्किंग करून उभ्या होत्या. एकही रिक्षा रस्त्यावर धावत नव्हती. ठाण्यात मुलूंड चेकनाका, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, वर्तक नगर या रस्त्यावर निर्मनुष्य होते. ठाण्यातील तलावपाळी परिसराला नेहमीच प्रेमीयुगलांचा विळखा असतो त्या परिसरात पूर्णपणे शुकशुकाट पसरला होता. तसेच नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, भिवंडी, कर्जत कसारा आदी परिसरातही बंदला कडकडीत प्रतिसाद लाभला. कल्याणचे पत्रीपुलावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. मात्र रस्त्यावर एकही वाहन धावत नसल्याने वाहतूक कोंडीतून पत्रीपूल मुक्त झालेला दिसत होता.

शहरातील चौका चौकात पोलीस कर्मचारी ठाण मांडून होते. प्रत्येकजण घरीच असल्याने त्यांनी कुटूंबियांसोबत दिवस घालवला. अनेक सोसायटी व इमारतीत मुले कॅरम व बुध्दीबळ खेळण्यात रंगली होती. रस्त्यावर केवळ पोलीस कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी ऑन ड्युटी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -