घरमुंबईमहापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर सुविधा पुरविणार

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर सुविधा पुरविणार

Subscribe

विभागीय आयुक्तांची ग्वाही, प्रशासनाला सूचना

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी येणार्‍या अनुयायांना प्रशासनातर्फे सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.

चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, परिसरातील स्वच्छता, शौचालयांची व्यवस्था, चैत्यभूमीशेजारील समुद्रावर अधिकची सागरी जीवरक्षक नौकांची व्यवस्था करणे, आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी या अनुषंगाने दौंड यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शन आयोजित करावे, मार्गावर सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था, भोजन व्यवस्था, अतिरिक्त एसटी बसेस सोडाव्यात, रेल्वेसेवा सुरळीत चालविण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे चैत्यभूमीच्या परिसरातील अन्नदानाच्या स्टॉलवरील अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यातून तसेच परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर येतात. त्या ठिकाणी पुरवावयाच्या सोयी-सुविधांबाबत आढावा घेण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस, बेस्ट, वाहतूक विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सामाजिक न्याय विभाग, तटरक्षक दल, रेल्वे आदी विभागांचे अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -