घरमुंबईईशान्य मुंबईत युतीचा जल्लोष

ईशान्य मुंबईत युतीचा जल्लोष

Subscribe

सहापैकी पाच मतदार संघावर फडकला भगवा

अपेक्षेप्रमाणे ईशान्य मुंबईतील मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व व घाटकोपर पश्चिम या मतदार संघात युतीचाच भगवा फडकला. भगवा फडकण्यात युतीला यश आले असले तरी भाजपचे राम कदम यांचा बालेकिल्ला असलेल्या घाटकोपर पश्चिम व विद्यमान आमदाराला डावलल्याने चर्चेत आलेला भांडुप पश्चिम मतदार संघात शिवसेनेला विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली. त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघ खेचून आणण्यासाठी शिवसेनेने आखलेली रणनिती कोठेतरी कमी पडल्याने अबु आझमी यांना आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश आले.

चुरशीनंतरही सोपा विजय
भांडुप पश्चिम मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असला तरी तो फारसा कधी चर्चेत नसतो. परंतु यंदा मातोश्रीवरून भांडुपमधील विद्यमान आमदार अशोक पाटील यांना उमेदवारी नाकारत रमेश कोरगावर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे अशोक पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्याचा परिणाम पहिल्या काही फेर्‍यांमध्ये दिसून आला. काँग्रेसचे उमेदवार सुरेश कोपरकर यांनी पहिल्या काही फेर्‍यांमध्ये आघाडी घेतली होती. त्यामुळे शिवसेनेच्या गोटामध्ये खळबळ माजली होती. मात्र सुरुवातीच्या फेर्‍यानंतर मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात मते टाकल्याने कोरगावकर यांचा विजय सोपा झाला. कोरगावकर यांना 71 हजार 955 मते मिळाली. त्यामुळे एकतर्फी असलेली ही लढत काही चुरशीची झाली.

- Advertisement -

शिवसेनेचा एकहाती विजय
एकतर्फी समजल्या जाणार्‍या विक्रोळी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय पिसाळ यांनी जोरदार प्रचार करत ही लढत सोपी नसल्याचे चित्र निर्माण केले. परंतु पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत शिवसेनेचे सुनील राऊत यांनी आघाडी कायम ठेवली. काही फेर्‍यांमध्ये पिसाळ यांच्या पारड्यात मते पडली, मात्र त्यांना आघाडी कमी करण्यात यश आले नाही. सुनील राऊत यांना 62 हजार 794 मते पडल्याने त्यांनी गतवेळच्या तुलनेत अधिक मते पडली. राऊत यांचा तब्बल 27 हजार 841 मतांनी विजय झाला.

शिवसेनेच्या बंडखोरीनंतरही कदम यांचा मार्ग सोपा
भाजपच्या राम कदम यांचा बालेकिल्ला असलेल्या घाटकोपर पश्चिम मतदार संघामध्ये शिवसेनेतून बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या संजय भालेराव यांनी चांगली झुंज दिली. भालेराव यांना 38 हजार 971 मते घेत राम कदम यांना कडवी झुंज दिली असली तरी राम कदम यांनी 27 हजार 731 मतांनी आघाडी घेत आपले वर्चस्व दाखवून दिले. राम कदम यांना 66 हजार 702 मते पडली असली तरी गतवेळच्या तुलनेत त्यांच्या मतांमध्ये मोठी घट झाली. 2014 च्या तुलनेत राम कदम यांना 80 हजार 343 मते मिळाली होती. परंतु वादग्रस्त विधाने व भालेराव यांनी केलेल्या मतदार बांधणीचा फटका कदम यांना बसल्याचे दिसून आले.

- Advertisement -

मेहतांच्या नाराजीचा फटका नाही
त्याचप्रमाणे घाटकोपर पूर्वे हा भाजपचा बालेकिल्ला असून, या मतदारसंघातून माजी गृहमंत्री प्रकाश मेहता सलग पाच वेळा निवडून आले होते. परंतु गैरव्यवहारप्रकरणात अडकल्यामुळे प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारत भाजपने पराग शहा यांना उमेदवारी जाहीर केली. श्रीमंत उमेदवारापैकी एक समजल्या जाणार्‍या पराग शहा यांना मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत त्यांची गाडी फोडली. त्यामुळे भाजपमधील उभा वाद समोर आला. मेहता सुद्धा शहा यांच्या प्रचारापासून दूर राहिल्याने त्यांना अधिक मेहनत करावी लागली होती. परंतु घाटकोपर पूर्वे मतदार संघातील मतदारांनी शहा यांच्या पारड्यात तब्बल 73 हजार 54 मते टाकत त्यांना एकहाती विजय मिळवून दिला. शहा यांनी तब्बल 53 हजार 319 मतांची आघाडी घेतली.

कोटेचा यांना यश; मताधिक्य घटले
घाटकोपर पूर्व प्रमाणे मुलुंडमध्ये सरदार तारासिंग यांना डावलून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. कोटेचा यांना 84 हजार 255 मते मिळाली असून, मनसे व काँग्रेसच्या उमेदवाराला कोटेचा यांच्या जवळही जाता आले नाही. कोटेचा यांचा तब्बल 55 हजार 251 मतांनी विजय झाला. मात्र 2014 च्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये तब्बल 9 हजार 595 मतांची घट झाली. 2014 मध्ये भाजपच्या सरदार तारासिंग यांना तब्बल 93 हजार 850 मते मिळाली होती.

अबु आझमींनी गड राखला
ईशान्य मुंबईतील सहाही मतदार संघामधील लढती या एकतर्फी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच मानखुर्द शिवाजी नगरमध्ये समाजवादी पक्षाच्या अबु आझमी यांना शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांनी कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मानखुर्दमधील वाढत्या अंमली पदार्थाचा व आयात उमेदवाराचा मुद्दा उपस्थित करत लोकरे यांनी वातावरण तापवले होते. मात्र त्याचा फारसा फरक आझमी यांना जाणवला नाही. मानखुर्द शिवाजी नगरमधील मुस्लिम मतदारांनी आझमी यांच्याच पारड्यात विजय टाकत त्यांना तब्बल 69 हजार 82 मते दिली. तर लोकरे यांना 43 हजार 481 मते पडली.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -