आंबेडकर-ओवेसी युती भाजपच्या पथ्यावर – शिवसेनेचा हल्लाबोल

प्रकाश आंबेडकर आणि असादुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे या युतीची सभाही होणार आहे. या घटनेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून या युतीवर परखड मतप्रदर्शन केले.

Mumbai
Ambedkar, Owaisi, Shiv Sena

मुंबई : प्रकाश आंबेडकर व असादुद्दीन ओवेसी एकत्र आले आहेत. 2019 च्या निवडणुका ते एकत्र लढतील आणि ताकद दाखवतील, अशी घोषणा उभयतांकडून करण्यात आली आहे. हे दोघेही कालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे राजकारण पडद्यामागून करीत होते. आता ते दोघे उघड उघड हातात हात घालून 2019 सालात भाजपाला मदत करतील. त्यासाठीच आंबेडकर आणि ओवेसी यांची अभद्र युती झाली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम या दोन पक्षांच्या युतीवर हल्लाबोल केला.

प्रकाश आंबेडकर आणि असादुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे या युतीची सभाही होणार आहे. या घटनेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून या युतीवर परखड मतप्रदर्शन केले.

दलितांनी दलित म्हणूनच डबक्यात रहावे आणि मुसलमानांनी देशाचे नागरिक म्हणून नव्हे, तर फक्त मुसलमान म्हणूनच जगावे यासाठी डबकी तयार केली जातात. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले आहे. दलित व मुसलमानांनी एकत्र येऊन ही डबकी उधळून लावली पाहिजेत. 2019च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ आणि कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव आहे’, असा आरोप उद्धव यांनी केला आहे.

त्या दोघांचे एकत्र येणे हे भारताच्या राजकारणासाठी शुभसंकेत नाहीत.आंबेडकर व ओवेसी यांनी उघडपणे भारतीय जनता पक्षाबरोबर जायला हवे होते, पण ‘वंचित बहुजन आघाडी’च्या नावाखाली आंबेडकर-ओवेसी यांनी नवा तंबू टाकला आहे. एमआयएम हा मुस्लीम लीगचा भ्रष्ट अवतार आहे आणि मुसलमानांच्या व्होट बँकेचे राजकारण करून देशात फुटीची बीजे रोवण्याचे त्यांचे काम सुरू आहे. ‘पंचवीस कोटी मुसलमान हिंदूंना भारी पडतील. पोलिसांना दूर ठेवा, आम्ही हिंदुंच्या कत्तली करू’, अशी कसाईछाप भाषा वापरणार्‍या ओवेसीशी हातमिळवणी करून प्रकाश आंबेडकरांनी दलित समाजाला नव्या खड्ड्यात ढकलले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाज बांधवांसाठी अमृताचा प्याला दिला. त्यात विष कालवण्याचे काम करू नका. अर्थात कोणी कितीही मांडीवर थापा मारल्या तरी दलित समाज व राष्ट्रवादी मुसलमान हा शहाणाच आहे. नव्या अभद्र युतीकडे तो वळणार नाही. महाराष्ट्रातील दलित संघटना या सत्ताधार्‍यांच्या दावणीला कायम बांधलेल्या असतात व समाजापेक्षा स्वतःचेच हित ते पाहत असतात. कोणत्याही रिपब्लिकन नेत्याला जनाधार नाही व अस्मिता नाही. जातीधर्माच्या नावाने त्यांचे चांगभले सुरूच असते. प्रकाश आंबेडकर ओवेसीच्या तंबूत गेले त्यातून त्यांचाच खरा चेहरा उघड झाला.

ओवेसीची भाषा अस्थिरता आणि अराजक निर्माण करणारी असते. ती प्रकाश आंबेडकरांना मान्य आहे काय? त्यांना दलितांचे न्याय्य हक्क हवे आहेत, म्हणजे नक्की काय हवे आहे? दलितांची माथी भडकवायची. त्यांच्या मनात अशांततेचे विचार टाकायचे आणि राज्यात दंगलींचा धूर काढायचा, असा ओवेसीबरोबरच्या आघाडीचा अर्थ उद्या कोणी काढला तर त्याचे काय उत्तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे? पुन्हा रोटी, कपडा आणि मकान यासाठी त्यांच्या आघाडीकडे काय कार्यक्रम आहेत? बेरोजगारीवर कोणता उतारा आहे? दलित वस्त्यांतील राजकारण भडकत ठेवायचे आणि आपापसात दुही माजवायची हे सर्व दलित संघटनांचे आजवरचे धोरण राहिले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here