अंबरनाथमधील सिस्टर निवेदिता शाळेची मान्यता रद्द; पालक चिंताग्रस्त

येथील सिस्टर निवेदिता या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मान्यता रद्द झाल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकसुद्धा चिंताग्रस्त झाले आहेत.

Ambernath
Ambernath's sister nivedita school's grant cancelled

येथील सिस्टर निवेदिता या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मान्यता रद्द झाल्याचे लेखी पत्र गटशिक्षणाधिकारी यांनी दिले असून शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळेत समाविष्ट करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. अंबरनाथ (पूर्व) येथील लोकनगरी परिसरात विश्वेश्वर को. ऑप. सोसायटीमध्ये शाळेसाठी राखीव असलेला भूखंड संभावी एज्युकेशन ट्रस्टला भाडेतत्त्वावर दिला होता. या संस्थेने या भूखंडावर सिस्टर निवेदिता ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. मात्र २००३ मध्ये हा भूखंड शासनाने वनखात्याच्या अखत्यारीत असल्याचे घोषित केले. त्यामुळे या ठिकाणी शाळेचे बांधकाम होऊ शकले नाही. दरम्यान शाळेने सोसायटीच्या पडीक जागेत ही शाळा सुरू केली व तात्पुरता स्वरूपात विनाकरार भाड्याने घेतला. या ठिकाणी सिस्टर निवेदिता ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू असून पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत.

इमारत धोकादायक

सध्या शाळेत जवळपास ३५० विद्यार्थी आहेत. शाळा सुरू असलेल्या इमारतीला नगरपालिकेची मान्यता नाही. शाळेच्या निकषाप्रमाणे येथे मुले आणि मुलींसाठी वेगळे प्रसाधनगृह नाही. त्याचप्रमाणे इमारत ही धोकादायक असल्याने ती कधीही कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वेश्वर को. ऑप. सोसायटीचे सदस्य संजय जाधव यांनी दिली आहे.

पालक चिंताग्रस्त

सिस्टर निवेदिता शाळेला शासनाच्या आवश्यक निकषांची पूर्तता न केल्यामुळे ही शाळा तात्काळ बंद करावी. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य मान्यताप्राप्त शाळेत सामावून घ्यावे, असे लेखी आदेश गटशिक्षणाधिकारी रा. ध. जतकर यांनी गेल्या महिन्यात दिले आहेत. मात्र ही प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी जतकर यांना विचारले असता ते म्हणाले की, “आम्ही शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पुढील कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत.”