घरमुंबईराजस्थानच्या निवडणुकीसाठी भाजपकडून दीड लाख मतदारांना विमान प्रवासाचे पॅकेज

राजस्थानच्या निवडणुकीसाठी भाजपकडून दीड लाख मतदारांना विमान प्रवासाचे पॅकेज

Subscribe

राजस्थानमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बेहाल झालेल्या भाजपने आता इतर राज्यातील राजस्थानींची मदत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशा महानगरात वास्तव्याला असलेल्या राजस्थानी नागरिकांना विमान प्रवासाचे पॅकेज देऊन त्यांना त्या राज्यातल्या मतदानासाठी नेण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. या महानगरांमध्ये राजस्थानी नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. व्यवसायानिमित्त राज्यात राहणार्‍या राजस्थानी नागरिकांची नाळ आजही आपल्या गावाशी जोडलेली आहे. यामुळेच त्यांची नावे राजस्थानमधल्या विविध मतदारसंघात नोंदली गेली आहेत. याचाच फायदा भाजपने निवडणुकीसाठी घेण्याचे ठरवले आहे.

राजस्थानच्या निवडणुकीत भाजपची अवस्था बिकट झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत ज्या तीव्रतेने तो पक्ष सत्तेवर आला त्याच तीव्रतेने तो या निवडणुकीत मागे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ताकद असलेल्या राज्यातून सत्ता जाणे हे भाजपला परवडण्यासारखे नाही. यामुळेच इतर राज्यात विसावलेल्या राजस्थानी मतदारांकडे त्या पक्षाची नजर गेली आहे. महाराष्ट्रात तिथल्या नागरिकांची सर्वाधिक संख्या ही मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात आहे. तिथल्या मतदारांना राजस्थानमध्ये नेऊन मतदान करण्यासाठी भाजप नेते कामाला लागले आहेत. राजस्थानी नागरिकांनी आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी मुंबईत आपापल्या समाजाच्या संस्था स्थापन केल्या आहेत. रजपूत, जाट, गुर्जर समाजाच्या संस्थांचे सभासद तर कित्येक हजारांवर मुंबईत आहेत. शिवाय जिल्हा, तालुका, गावनिहाय संस्था आणि संघटनांची संख्याही हजारांवर आहे. या संस्थांशी संबंधित मतदारांनी मतदानात भाग घेतला तर त्याचा फायदा आपल्या उमेदवारांना होऊ शकतो, हे हेरून भाजपने या मतदारांना राजस्थानला ने-आण करण्याचा मार्ग अवलंबला आहे.

- Advertisement -

भाजपच्या वतीने राज पुरोहित, ओमप्रकाश माथूर आणि गुलाबचंद कटारिया यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते राजस्थानी संस्थांच्या बैठका घेऊन मतदारांची जमवाजमवी करत असल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या या प्रयत्नांना काँग्रेसचे निरज डांगी यांनी आक्षेप नोंदवल्याचे सांगण्यात आले. ओमप्रकाश माथूर आणि गुलाबचंद कटारिया यांना मानणारा एक वर्ग मुंबईत आहे. वसुंधरा राजे सरकारच्या काळात या दोन्ही नेत्यांनी काही बड्या व्यापार्‍यांना राजस्थानात हातपाय पसरायला राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर मदत केली होती. याचा फायदा या निवडणुकीत हे नेते घेत आहेत.

विशेष म्हणजे मूळ राजस्थानी असलेले मुंबईतील काही व्यापारीही यंदा विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. भाजपच्या ललित ओस्तवाल(बडी सादडी), नारायणसिंह देवल(राणीवाडा), पुराराम चौधरी(भीनमाल), अतुल भंसाळी(जोधपूर शहर) यांचा सामावेश आहे. यापैकी मंडेलिया आणि ओस्तवाल हे मुंबईतील नावाजलेले विकासक आहेत. शिवाय प्रसिद्ध लोखंड व्यापारी जीवाराम चौधरी हे सांचोर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

- Advertisement -

मुंबईत पक्ष कार्यालय

राणीवाडा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रतन देवासी यांनी दक्षिण मुंबईतील गिरगावात कार्यालय उघडले आहे. राणीवाडा मतदारसंघात भाजपाने मुंबईतील प्रसिद्ध व्यापारी नारायणसिंह देवल यांना रिंगणात उतरवले आहे. देवल यांचा मुंबईस्थित राजस्थानी समाजात फार मोठा दबदबा आहे. शिवाय निवडणुकीसाठी भाजपाला मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य केल्याचीही चर्चा आहे. देवल यांचा हक्काचा मुंबईकर मतदार ‘फोडण्यासाठी’च रतन देवासी यांनी मुंबईत कार्यालय उघडले आहे.

मतदारांना विमान प्रवास

मतदारांना मुंबईतून गावी येण्यासाठी त्या-त्या मतदारसंघांतील उमेदवाराकडून विमानाचा प्रवास खर्च देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. काहींनी सार्‍या कुटुंबाची ने आण करण्याची व्यवस्था केली आहे. मतदानाला जाण्यासाठी तसेच नंतर येण्याचे विमान तिकीटही उमेदवारांनी दिल्याची माहिती पुढे येत आहे. एका उमेदवाराने मुंबई ते मारवाड जाण्यासाठी खासगी बस निवडणुकीच्या आदल्या दिवशी आरक्षित केल्याचे सुरजसिंग मेवाड या राजस्थानी व्यक्तीने सांगितले.

दीडलाख मतदार रवाना

मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे या परिसरातून आतापर्यंत सुमारे ७५ हजार मतदार राजस्थानकडे रवाना झाले आहेत. ते आमच्या पक्षासाठी स्वत:हून मतदानाला गेले आहेत. त्यांना काहीही देण्याची आवश्यकता पडलेली नाही. स्वत:च ते इथे आले आहेत. महाराष्ट्रातील आमच्या आमदारांना राजस्थानी मतदारांची माहिती देण्यात आली आहे. ते या मतदारांना एकत्र करून पाठवत आहेत. राज्यातून दीड लाख मतदार इथे आले आहेत.
– राज पुरोहित, प्रतोद, भाजप.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -