घरCORONA UPDATEधक्कादायक : ठाण्यात रुग्णालयाबाहेर तडफडून वृद्धाचा मृत्यू

धक्कादायक : ठाण्यात रुग्णालयाबाहेर तडफडून वृद्धाचा मृत्यू

Subscribe

पाचपाखाडी येथील रुग्णालयात आणल्यानंतर सामान्य की आयसीयू असा घोळ घालत उपचार न झाल्यामुळे वृद्धाला रुग्णालयाबाहेर प्राण गमवावे लागले.

ठाणे शहरातील ‘कोरोना’च्या रुग्णांसाठी रुग्णवाहिका व रुग्णालयाची व्यवस्था करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत असून, सलग दुसऱ्या दिवशी वागळे इस्टेट येथील एका वृद्धाचा रुग्णालयाबाहेरील स्ट्रेचरवर उपचारांअभावी तडफडून मृत्यू झाला. दोन दिवस झाल्यानंतरही रुग्णाला जागेअभावी दाखल केले नव्हते. तर पाचपाखाडी येथील रुग्णालयात आणल्यानंतर सामान्य की आयसीयू असा घोळ घालत उपचार न झाल्यामुळे वृद्धाला रुग्णालयाबाहेर प्राण गमवावे लागले. दरम्यान, याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

वागळे इस्टेट परिसरातील शांतीनगर येथे राहणाऱ्या एका ७० वर्षांच्या वृद्धाची प्रकृती बिघडली होती. त्यांना सलग दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती. पहिल्याच दिवशी त्यांच्या मुलाने महापालिकेकडे रुग्णवाहिका व रुग्णालयाचे नाव देण्याची विनंती केली. मात्र, महापालिका प्रशासनाने काहीही कळविले नाही. त्यांच्या मुलाने थेट एका रुग्णालयात संपर्क साधून वडिलांना दाखल करण्याची विनंती केली. मात्र, महापालिकेच्या डॉ. कोर्डे यांनी फोन केल्याशिवाय आम्ही कोणालाही दाखल करून घेणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर गुरूवारी सायंकाळी नगरसेवक नारायण पवार यांनी डॉ. कोर्डे यांच्याशी संपर्क साधून, रुग्णालयात वृद्धाला दाखल करण्याची देण्याची विनंती केली. अखेर पाचपाखाडी येथील एका रुग्णालयात रात्री नऊच्या सुमारास सामान्य कक्षात जागा असल्याचे महापालिकेतून सांगण्यात आल्यावर वृद्धाला तेथे नेण्यात आले. मात्र, त्याला लगेचच दाखल करून न घेतल्याने त्यांची प्रकृती बिघडत होती. काही काळानंतर तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज आहे. मात्र, आमच्याकडे आयसीयूत जागा शिल्लक नाही. त्यामुळे आम्ही त्याला दाखल करु शकत नाही. तुम्ही दुसऱ्या रुगणालामध्ये चौकशी करा, असे त्यांच्या मुलाला सांगण्यात आले. या काळात उपचाराअभावी त्या रुग्णाचा स्ट्रेचरवरच तडफडून मृत्यू झाला, असे नगरसेवक पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

इटलीमध्ये रस्त्यावर मृत्यू झाल्याचे आम्ही पाहिले होते. आता ठाणे शहरातही असे प्रकार पाहावयास मिळत आहे, हे दुर्देव आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला खडसावले. मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. शहरातील रुग्णवाहिका अधिग्रहित करण्यात आलेल्या नाहीत ‘कोरोना’ सेल नक्की काय काम करतो, याचा उलगडा होत नाही. ही परिस्थिती न सुधारल्यास जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

रुग्णवाहिकेअभावी रुग्णालयातून डिस्चार्ज थांबविले 

महापालिका क्षेत्रात रुग्णवाहिकेची संख्या कमी असल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची ने-आण करण्यात अडचणी येत आहेत. पाचपाखाडीतील एका रुग्णालयात गुरूवारी दुपारी संपर्क साधला. त्यावेळी चार रुग्णांचा डिस्चार्ज झाला होता. मात्र, ते महापालिकेची रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णालयात थांबले असल्याचे सांगण्यात आले. त्यांना खासगी रुग्णवाहिकांच्या चालकांकडून १० ते १५ हजार रुपये दर सांगण्यात आला होता. त्यामुळे नाईलाजास्तव सर्व रुग्ण ताटकळत होते. पर्यायाने कोरोनाच्या अन्य रुग्णांनाही दाखल केले जात नव्हते. त्यामुळे महापालिका व रुग्णालय यांच्यात समन्वय नसल्याचे स्पष्ट होते. या परिस्थितीत संबंधित रुग्णालयांच्या व्यवस्थापनांनाच रुग्णवाहिकेने रुग्णांना घरी सोडण्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -