अजबच! मुंबईत पिन न टाकताच ATMमधून आले ९६ हजार रुपये!

मुंबईतील अंधेरीच्या एका एटीएममधून चक्क एटीएम पिन न टाकताच ९६ हजार रुपये बाहेर आल्याची अजब घटना समोर आली आहे.

Mumbai
ATM

आपल्याबैकी बहुतेक जण एटीएमचा वापर करतात. आपलं कार्ड स्वाईप केलेलं असताना देखील पैसे न येणं, कार्ड आतमध्येच अडकणं किंवा मग पैसे डेबिट झाल्याचा मेसेज येऊन देखील एटीएममधून पैसेच न येणं असे प्रकार अनेकांच्या बाबतीत घडत असतात. त्यामुळे होणारा मनस्ताप अनेकांना सहन करावा लागतो. पण असं कधी झालंय का? की तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला गेलेले असताना तुमच्या अकाऊंटमधून एक रुपयाही डेबिट झाला नाही, पण एटीएममधून एकदम तब्बल ९६ हजार रुपये निघाले? कदाचित आपल्यापैकी इतकं भाग्यवान कुणीही नसावं. पण मुंबईच्या अंधेरी पूर्व भागामध्ये राहाणाऱ्या एका सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटंटचं भाग्य मात्र शुक्रवारी भलतंच जोरावर निघालं!

पाऊस पडावा तशा नोटा येत होत्या!

डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, अंधेरीत राहाणाऱ्या सीए रफीका महेदीवाला या शुक्रवारी साकीनाक्याच्या सागर टेक प्लाझामध्ये असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या. त्यांनी रीतसर कार्ड देखील स्वाईप केलं. पण एटीएम पिन नंबर टाकण्याआधीच अचानक एटीएममधून मोठा आवाज यायला लागला. अवघ्या काही क्षणांत एटीएममधून पाऊस पडावा तशा नोटा बाहेर यायला लागल्या. या सगळ्या ५०० रुपयांच्या नोटा होत्या. नोटा थांबायचं नाव घेत नव्हत्या आणि रफीका यांचं टेन्शन वाढू लागलं होतं. भरपूर नोटा बाहेर आल्यानंतर शेवटी मशीन थांबलं. त्यावेळी त्यांनी लागलीच आपला मोबाईल तपासला. त्यामध्ये पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आला नव्हता.


हेही वाचा – एटीएम फसवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर!

पण मग हे पैसे बाहेर आले तरी कसे?

खरंतर आपल्या खात्यातून एक रुपयाही डेबिट झाला नाही हे समजल्यानंतर रफीका यांना हुश्श्य झालं. पण मग इतके पैसे एटीएममधून आपोआप बाहेर आले तरी कसे? असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी एटीएमच्या सुरक्षा रक्षकासोबत मिळून हे पैसे मोजले, तर ते बरोबर ९६ हजार रुपये झाले. त्यांनी लागलीच एटीएमच्या सीसीटीव्हीमध्ये बँकेच्या प्रशासनाला व्हिडिओ मेसेज दिला. सुरक्षा रक्षकाला बँक मॅनेजरला माहिती द्यायला सांगितलं. त्यांनी स्वत: देखील बँकेला मेलवर हा सगळा प्रकार कथन केला. आणि सगळी रक्कम सुरक्षारक्षक शेशनाथ यादव याच्याकडे सोपवली.