Andheri Fire : कुणाचा जीव वाचवण्यासाठी धर्म आड येत नाही!

अंधेरीच्या कामगार हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीमध्ये क्रेन ऑपरेटर रेहमुद्दीन शेख यांनी पुढाकार घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या खांद्याला खांदा लावून लोकांचे प्राण वाचवले. काय पाहिलं त्यांनी तिथे?

Mumbai
Andheri Hospital Fire - Crane Operator Rehamuddin Shaikh
अंधेरी हॉस्पिटल आग - क्रेन ऑपरेटर रेहमुद्दीन शेख

अंधेरीच्या कामगार हॉस्पिटलमध्ये सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास आग पसरली आणि सगळाच हलकल्लोळ माजला. रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असल्यामुळे शेकडो लोकांचे प्राण धोक्यात आले. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि त्यासोबतच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि हॉस्पिटलचा इतर स्टाफ आग लागली तेव्हा हॉस्पिटलमध्येच होते. मात्र, अग्निशमन दलाचे अधिकारी-जवान, पाण्याचे बंब आणि इतर रुग्णालयाच्या रुग्णवाहिका यांनी मिळून संपूर्ण बचावकार्य पार पाडलं. त्यांना आसपासच्या स्थानिकांची देखील मोठी मदत झाली. यामध्येच एक होते क्रेन ऑपरेटर रेहमुद्दीन शेख!

समोरचं दृश्य थरकाप उडवणारं होतं!

सध्याच्या कामगार हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागेच इएसआयसीच्याच नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी क्रेन ऑपरेटर रेहमुद्दीन शेख तिथे होते. त्याच दरम्यान, हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीमध्ये गडबड सुरू झाल्याचं त्यांना कळलं. आणि कोणताही विचार न करता त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. समोर दिसणारं दृश्य काळजाचा थरकाप उडवणारं होतं. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर भीषण आग पसरली होती. आतले रुग्ण जीव वाचवण्यासाठी खिडकीतून बाहेर आले होते. अग्निशमनचे अधिकारी या रुग्णांना खिडकीतून बाहेर काढण्यासाठी शिडी लावून किंवा रस्सी सोडून वाचवण्याचा प्रयत्न करत होते.


हेही वाचा – ‘मी झोपेतच होतो आणि अचानक काळोख झाला’

..आणि त्यांनी आग लागलेल्या मजल्यावर धाव घेतली!

समोरचं दृश्य पाहून रेहमुद्दीन शेख यांना त्यावेळी एकच गोष्ट सुचली. आणि ती म्हणजे आत अडकलेल्यांना वाचवणं. एरवी हिंदू-मुस्लीम वादाच्या, भांडणाच्याच बातम्या कानावर पडत असताना रेहमुद्दीन शेख यांनी यातून एक वेगळाच आदर्श समाजासमोर घालून दिला. आत अडकलेले कोणत्या धर्माचे आहेत, हे न पाहाता त्यांनी थेट आग लागलेल्या चौथ्या मजल्यावर धाव घेतली…आत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी!

मी क्रेन जवळ बसलो होतो. अचानकच लोकं धावायला लागले. आधी कळलंच नाही काय होतंय. पण नंतर फायर ब्रिगेडचे जवान आले आणि कळलं की हॉस्पिटलमध्ये आग लागली आहे. तेव्हा आमची धावपळ सुरू झाली. आम्ही हॉस्पिटलच्या ४ थ्या मजल्यावर गेलो. तिथल्या रुग्णांना बाहेर काढलं. मग पुन्हा टेरेसवर गेलो. तिथे काही जण अडकले होते‌. त्यांना फायर ब्रिगेडच्या गाड्यांपर्यंत पोहोचायला मदत केली. खाली उतरवलं. एक महिला जवळपास पाऊण तास मजल्याच्या खिडकीवर लटकत होती. तिला ही फायर ब्रिगेडच्या जवानांनी खाली घेतलं.

रेहमुद्दीन शेख, क्रेन ऑपरेटर

म्हणून ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात!

समोर उडालेल आगीचा भडका पाहून त्यात स्वत:चा जीव धोक्यात घालून उडी मारायला कुणी धजावणार नाही. पण रेहमुद्दीन शेख यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या खांद्याला खांदा लावून बचावकार्यात मदत केली. एरवी दखलही न घेता दुर्लक्ष केलं जाणाऱ्या अशा माणसांचं वेगळेपण अशा घटनांमधून सर्वांसमोर येतं…अगदी ठळकपणे!


हेही वाचा – वर्षापूर्वीच अग्निसुरक्षेबाबत केली होती तक्रार!