मुंबईतील ९९ टक्के घरांपर्यंत पोहोचली कोरोनाविरोधी मोहीम

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेने अवघ्या एक महिन्यात मुंबईतील एक कोटींंपेक्षा अधिक नागरिकांचे सर्वेक्षण केले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अंतर्गत एका महिन्यांत एक कोटी नागरिकांचे सर्वेक्षण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जनजागृतीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेने अवघ्या एक महिन्यात मुंबईतील एक कोटींंपेक्षा अधिक नागरिकांचे सर्वेक्षण केले. मुंबईतील ९९ टक्के घरांपर्यंत ही मोहीम पोहचवण्यात पालिकेला यश आले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबरदरम्यान राज्यात ३५ लाख २२ हजार ७४० घरांपैकी ९९ टक्के म्हणजेच ३४ लाख ८९ हजार २५५ घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये १ कोटी ४० लाख ६५ हजार ९७६ नागरिकांपैकी १ कोटी ६ लाख ४६ हजार ७४९ नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. ‘कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासह प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेचे स्वयंसेवकांचे चमू घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेत आहेत. यामध्ये वय, लिंग यासह मधुमेह, रक्तदाब यासारख्या सहव्याधींची माहिती घेण्यासह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान व ऑक्सिजन पातळी नोंदवून घेत आहेत. त्याचबरोबर कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कोणकोणत्या उपाययोजना अंमलात आणाव्यात, याची माहिती घरोघर जाऊन देण्यात येत आहे. तसेच ही माहिती सहजसोप्या भाषेत देणारे एक पत्रक देखील घरोघरी देण्यात येत आहे.

महापालिका क्षेत्रात लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे.

आरोग्यसेविकांच्या ४११० तुकड्या

मुंबईत १५ सप्टेंबरपासून सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेत ११,४९२ आरोग्य सेविका व स्वयंसेवक कार्यरत आहेत. या आरोग्यसेविका आणि स्वयंसेवकांचे ४११० तुकड्या बनवण्यात आल्या आहेत. या तुकड्या घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करत आहेत.