घरमुंबईपाचुबंदरातील अतिक्रमणविरोधी मोहीम बारगळलेलीच

पाचुबंदरातील अतिक्रमणविरोधी मोहीम बारगळलेलीच

Subscribe

पाचुबंदरच्या चौपाटीवर आणि तिवरांच्या जंगलात झालेल्या अतिक्रमणांवर महापालिका आणि महसूल विभागाने आयोजित केलेली कारवाईची संयुक्त मोहीम पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याच्या कारणास्तव बारगळली. संबंधित यंत्रणांच्या दिरंगाईमुळे सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असलेली अतिक्रमणे आता खूप वाढली आहेत.

वसईच्या पाचुबंदर येथील चौपाटीवर आणि त्यालगतच्या मच्छीमारांच्या सार्वजनिक वापराच्या जागेवर काही खाजगी इसमांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या वापराचे क्षेत्र कमी झाले आहे. त्याचा मासळी सुकवण्यावर मोठा परिणाम होत आहे. वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेकडून या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यावर महसूल अथवा महापालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे तीन वर्षांपूर्वी असलेली तीन अतिक्रमणांची संख्या आता चाळीसहून अधिक झाली आहे.

- Advertisement -

तसेच काही जणांनी अतिक्रमण करताना तिवरांवर भराव करून कांदळवनाची नासधूसही केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची सातत्याने मागणी केल्यावर महापालिका आणि महसूल विभागाने एकमेकांकडे बोटे दाखवून टाळाटाळ केली. त्यामुळे संतप्त मच्छीमारांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर दोन्ही प्रशासनाने या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी संयुक्त मोहिमेचे आयोजन केले होते. सहा मार्चला ही मोहीम राबवण्यात येणार होती. त्यामुळे सर्व मच्छीमारांमध्ये उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, कारवाईच्या दिवशी ग्रामस्थांशिवाय कोणतीही सरकारी यंत्रणा चौपाटीवर फिरकली नाही.

महापालिकेने या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी आपली यंत्रणा पाठवली होती.या यंत्रणेसह महसूल विभागाचे कर्मचारी वसई पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून बसले होते. मात्र, दहावीच्या परीक्षेसाठी पोलीस बळ वापरले जात असल्यामुळे या मोहिमेला संरक्षण देता येत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली असल्याचे प्रभाग समिती आयचे सहाय्यक आयुक्त वनमाळी यांनी सांगितले.

- Advertisement -

तर आम्ही पोलिसांच्या संपर्कात आहोत. 9 मार्चनंतर पोलीस बंदोबस्त उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले, तर पाचुबंदरातील तिवरांची कत्तल करणार्‍यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्याच्या कार्यवाहीस सुरुवात करण्याचे निर्देश प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी मंडळ अधिकारी जाधव यांना दिले आहेत. मात्र,जाधव यांच्या कार्यपद्धतीवर मच्छीमारांनी आक्षेप घेतला आहे. पाचुबंदरात ज्यावेळी फक्त पाचच अतिक्रमणे होती. त्यावेळी जाधव कारवाईसाठी आले होते. त्यावेळी कारवाई न करताच ते निघून गेले. त्यानंतर या चार अतिक्रमणांची संख्या वाढत जाऊन 40 झाली आहे. आता कारवाई झाली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल असे संस्थेचे अध्यक्ष संजय कोळी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -