घरमुंबईलोकसभेपेक्षा एपीएमसीच्या निवडणुकीत राजकीय धुळवड

लोकसभेपेक्षा एपीएमसीच्या निवडणुकीत राजकीय धुळवड

Subscribe

भाजपचे, मनसे राष्ट्रवादी काँग्रेसशी गुप्तगू?

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असले तरीही कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागात लोकसभेपेक्षा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा राजकीय धुराळा उडाला आहे. तब्बल 36 वर्षानंतर प्रत्यक्ष निवडणुका होत असल्याने ग्रामीण भागात प्रचाराचा धुराळा उडाला आहे. स्थानिक पातळीवरील शिवसेना भाजपच्या अंतर्गत वादामुळे भाजपने शिवसेनेला बाजूला ठेवत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी गुप्तगू सुरू असल्याने शिमग्याआधीच राजकीय धुळवड सुरू झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र कल्याण महसूल तालुका असून, कार्यक्षेत्रात 121 गावांचा तसेच कल्याण आणि डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे. बाजार समितीची स्थापना सन 1957 साली झाली असली तरी प्रत्यक्षात कामकाज सन 1982 पासून सुरू आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवार 17 मार्च रोजी होत आहे. 18 जागांसाठी ही निवडणूक होत असून, प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे 16 जागांसाठी 52 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्य शासनाच्या नव्या निर्णयानुसार शेतकरी असणारी व्यक्तीच बाजार समितीचा सभासद असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी 121 गावातील सुमारे 18 हजार 700 मतदार आहेत.

- Advertisement -

बाजार समितीचे तत्कालीन सभापती रविंद्र घोडविंदे हे अन्य संचालकांना विश्वासात न घेताच कारभार करीत असल्याचा ठपका ठेवत समितीच्या 17 पैकी 15 संचालकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यामुळे घोडविंदे यांना सभापतीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे शासनाने समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे. मात्र, बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भाजपच्या एका आमदाराने चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष शिरकाव नसला तरी काही पक्षातील मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. भाजपने शिवसेनेला शह देऊन मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. शिवशाही शेतकरी पॅनेल, शेतकरी मतदारसंघांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. 36 वर्षानंतर प्रथमच प्रत्यक्ष निवडणूक होत आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात एपीएमसीच्या निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. लोकसभेपेक्षा एपीएमसी निवडणुकीचा प्रचाराचा चांगलाच रंग भरला आहे. 18 मार्चला मतमोजणी होणार असून, या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष वेधले आहे.

हे आहेत राखीव गण
मांडा, बल्याणी, बारावे, कल्याण, निळजे, नांदिवली, फळेगाव, कुंदे, गोवेली, वाहोली वावेघर आयरे खडवली, टिटवाळा हे गण आहेत. तसेच दोन जागा व्यापारी अडतवर्गासाठी आणि एक जागा हमाल माथाडी वर्गासाठी राखीव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -