घरमुंबईरेल्वेच्या हिल गँगमध्ये तान्हाजीच्या साहसाची झलक

रेल्वेच्या हिल गँगमध्ये तान्हाजीच्या साहसाची झलक

Subscribe

सह्याद्री पर्वत रांगेत असलेल्या मध्य रेल्वेच्या कर्जत लोणावळा घाटामधून रेल्वे सुरळीत चालावी यासाठी मध्य रेल्वेने मराठमोळ्या दोन हिल गँगची नियुक्ती केलेली आहे. या हिल गँगचे कामगार सह्याद्रीच्या उंच डोंगरावर चढून रेल्वेगाडी आणि रेल्वे रुळांवर दरड कोसळणार नाही, याची काळजी घेतात. त्यामुळे घाट विभागात रेल्वे वाहतूक सुरळीत राहते. मात्र त्यांना रेल्वेकडून कसलीही सुरक्षा दिली जात नाही. इतकेच नव्हेतर त्यांना प्रशिक्षणसुद्धा दिले जात नाही. तरीही ते आपले कर्तव्य चोखपणे पार पाडतात. तानाजी मालुसरे यांनी दोराच्या सहाय्याने कोंढाणा किल्ल्यावर चढाई केली होती आणि किल्ला जिंकला होता. त्यांच्या साहसाची झलक रेल्वेच्या हिल गँगमध्ये काम करणार्‍या या कामगारांमध्ये दिसते.

लोणावळा आणि कर्जत घाट विभागात उंचच उंच डोगरावर हिल गँग काम करते. सध्या मध्य रेल्वेवर दोन हिल गँग आहेत. प्रत्येक गँगमध्ये १५ माणसे आहेत. सध्या या दोन हिल गँगमध्ये फक्त दहा दहा कर्मचारी आहेत. एक हिल गँग लोणावळा घाट विभागात तर दुसरी कर्जत घाट विभागात कार्यरत आहे. या हिल गँगची उभारणी इंग्रजांनीच स्थानिक लोकांमधून केली होती. कारण सह्याद्री पर्वतरांगांमधील या दुर्गम भागाची, या ओबडधोबड डोंगरांची, जीवघेण्या चढउतारांची सखोल माहिती येथील लोकांना असते. त्यामुळे इंग्रज राजवटीपासून हिल गॅँगसाठी याच परिसरातील लोकांची भरती केली जाते. पूर्वी या हिल गँगमधील कामगारांची संख्या फार मोठी होती. मात्र दिवसेंदिवस या गँगमधील कामगारांची संख्या कमी होत आहे. रेल्वेकडून नवीन भरती करण्यात येत नाही. त्यामुळे असलेल्या लोकांवर कामाचा ताण वाढत आहे.

- Advertisement -
Appointment of Hill Gang in Central Railway
रेल्वेच्या हिल गँगमध्ये तान्हाजीच्या साहसाची झलक

हिल गँगच्या कामाची पध्दत
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये कधी सोसाट्याचा वारा, कधी मुसळधार पाऊस, कधी कडाक्याची थंडी, तर कधी अंग भाजून काढणारे रणरणते ऊन असते. त्यात जंगली श्वापदांचा वावर, सततचे पाण्याचे दुर्भिक्ष्य,अशा बिकट परिस्थितीत हे हिल गँगचे कामगार काम करतात. रेल्वेच्या घाट विभागात पावसाळ्यात दरड कोसळण्याचा घटना घडत असतात. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. डोंगरावरची दरड कोसळून ती रेल्वेवर किंवा रेल्वे रूळावर पडू नये, यावर लक्ष ठेवण्यासाठी या हिल गँगची महत्वपूर्व भूमिका असते. पावसाळ्यापूर्वी हिल गँगचे कामगार दोरीच्या सहाय्याने उंच डोंगरावर चढतात. ढिली झालेली दरड शोधतात. त्यानंतर मेगा ब्लॉक घेऊन या दरडी पाडण्याचे काम मोठ्या कौशल्याने करतात.

हिल गँगचे काम पिढ्यानपिढ्या
लोणावळ्याच्या हिल गँगमध्ये काम करणारे 59 वर्षीय अवजी आबा हे 1979 पासून या घाटात रेल्वेचे काम करत आहेत. अवजी आबा यांनी सांगितले की, या हिल गँगच्या कामासाठी रेल्वे कर्मचारी पुढे येत नाहीत. कारण हे काम मोठ्या साहसाचे आणि जीव धोक्यात घालून करावे लागते. त्यामुळे इथल्या स्थानिकांना हिल गॅगमध्ये प्राधान्य दिले जाते.

- Advertisement -

माझे वडील राजू मरोड हे हिल गँगमध्ये होते. ते निवृत्त झाल्यानंतर मी या हिल गँगमध्ये कार्यरत झालो. हे काम करत असताना सुरुवातीला मनात भीती होती, मात्र आता डोंगरावर चढण्याची सवय झाल्यामुळे भीती निघून गेली. मात्र हिल गँगमध्ये काम करत असताना सदैव तत्पर आणि सतर्क राहावे लागते. थोडीशी चूक झाली तर जीव गमावण्याची भीती असते. त्यामुळे आम्ही सर्व सतर्क असतो.
– निलेश मरोड, हिल गँग कामगार, कर्जत

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -