घरमुंबईआम्ही दहशतवादी आहोत का?

आम्ही दहशतवादी आहोत का?

Subscribe

माहुलवासीयांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

राहण्यायोग्य जागेत पुनर्वसन करावे, यासाठी 30 दिवसांपासून विद्याविहार येथे उपोषणाला बसलेल्या माहुलवासीयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यासाठी मंगळवारी बाईकरॅली काढली होती. मात्र पोलिसांनी बाईकरॅलीला परवानगी नाकारत मरीन लाईन येथे 12 कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे संतापलेल्या माहुलवासीयांनी घटनेने दिलेला राहण्याचा अधिकार मागण्यासाठीही आम्ही आंदोलन करू नये का? आम्ही दहशतवादी आहोत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

कुर्ला येथे एचडीआयएलने बांधलेल्या संक्रमण शिबिरात माहुलमधील नागरिकांना स्थलांतर करू. परंतु याबाबत चार दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी माहुलवासीयांना दिले होते. परंतु 15 दिवस उलटले तरी याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक घेतलेली नाही. त्यामुळे माहुलवासीयांनी मुख्यमंत्र्यांना चार हजारपेक्षा अधिक पत्र पाठवले आहेत. परंतु या पत्राचीही कोणतीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मंगळवारी माहुलमधील नागरिकांनी विद्याविहार ते मंत्रालय अशी बाईकरॅली काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर मंत्रालयाच्या मागील टपाल कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या नावे पोस्टकार्ड टाकण्यात येणार होते.

- Advertisement -

त्यानुसार मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास माहुलवासीय जमले असताना स्थानिक पोलिसांनी तेथे येऊन बाईक रॅलीसाठी परवानगी नाकारली. त्यामुळे माहुलवासीयांनी वेगळा मार्ग अवलंबत विद्याविहारऐवजी सायन येथून बाईकरॅली काढली. ही बाईकरॅली मरीन लाईन येथे पोहचल्यानंतर मरीन लाईन पोलिसांनी 12 कार्यकर्त्यांना अटक केली. या कार्यकर्त्यांना रात्री उशीरा सोडण्यात आले. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यासाठी गेलेल्या आंदोलकांकडे पत्र होते त्यांच्याकडे बंदुका नव्हत्या, ते काही दहशतवादी नव्हते, असे सांगत ‘घर बनाओ, घर बचाओ’च्या अनिता ढोले यांनी आपला संताप व्यक्त केला. हक्काच्या घरासाठी आंदोलन करण्यार्‍या नागरिकांचा आवाज दाबण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे. त्यामुळे घटनेने आम्हाला दिलेला अधिकारच सरकार हिरावून घेत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया माहुलमधील नागरिकांडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -