घरताज्या घडामोडीअर्णबचा पाय आणखी खोलात; TRP, हक्कभंग, पोलीस आणि बॉलिवूडची बदनामी भोवणार

अर्णबचा पाय आणखी खोलात; TRP, हक्कभंग, पोलीस आणि बॉलिवूडची बदनामी भोवणार

Subscribe

रिपब्लिक चॅनेलचे संपादक यांची पुर्णपणे कोंडी करण्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमार्फत विविध पातळ्यांवर जोर बैठका सुरू आहेत. पण फक्त अन्वय नाईक या एकाच प्रकरणात नव्हे तर याआधीच्या अनेक प्रकरणात अर्णब अडचणीत सापडू शकतो. पत्रकार अर्णब गोस्वामी याने गेल्या काही काळापासून अनेकांशी पंगा घेतला. राज्य सरकार, मुंबई पोलीस, बॉलिवूडवर गंभीर आरोप केले. त्यामुळेच अनेक पातळीवर अर्णब गोस्वामीला कशा पद्धतीने गोत्यात आणता येईल? यासाठीची जोरदार फिल्डिंग सध्या विविध पातळीवर सुरू आहे.

रिपब्लिक चॅनेलच्या माध्यमातून थेट लाईव्ह शोमध्ये राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रिटी, पोलीस यंत्रणा अशा अनेक क्षेत्रातील व्यक्तींना अर्णब गोस्वामी याने खुलेआम आव्हान दिले. पण विविध पातळीवर अर्णब गोस्वामींविरोधात लावण्यात येणारा सापळा पाहता त्यांना येणारे दिवस आणखी कठीण असतील असेच एकंदरीत दिसत आहे. कोणकोणत्या प्रकरणात अर्णबच्या अडचणीत वाढ होऊ शकते, याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा.

- Advertisement -

अन्वय नाईक प्रकरण

आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्या रिपल्बिक स्टुडिओचे इंटेरिअर डिझाईनचे काम केले होते. या कामादरम्यान झालेल्या व्यवहारातील पैसे परत न मिळाल्याने टोकाचे पाऊल उचलत अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली. पण आत्महत्येच्यावेळी लिहिण्यात आलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह आणखी दोन जणांच्या नावाचा उल्लेख केला होता. आपले कोट्यावधी रूपयांचे येणे अर्णब गोस्वामी यांच्याकडून न आल्यानेच बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले होते. या प्रकरणातून जर अर्णब गोस्वामींना जामीन मिळाला तर पुढच्या प्रकरणात ते पुन्हा अडचणीत येतील.

३४ चित्रपट निर्मात्यांच्या तक्रारी

बॉलिवुडमधील एकूण ३४ चित्रपट निर्मात्यांनी रिपब्लिक चॅनेलविरोधात काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. चुकीच्या पद्धीतने वार्तांकन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामध्ये बॉलिवुडमधील चार असोसिएशनचाही समावेश आहे. गैरजबाबदारपणे आणि अपमानजनक टीका केल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. बॉलिवुडसाठी अतिशय अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचेही याचिकेत नमुद केले आहे.

- Advertisement -

कॉंग्रेस अध्यक्षांवर टिप्पणी

एका लाईव्ह डिबेट दरम्यान रिपब्लिक टीव्हीवर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका करण्यात आली होती. या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अर्णब गोस्वामींवर दंगा भडकवण्याचा, धर्म आणि भाषेच्या आधारावर उकसावणे, धार्मिक भावना भडकावणे, मानहानी, दोन समुदायात वैमनस्य निर्माण करणे यासारखे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांची बदनामी

अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलीस दलाची बदनामी झाल्या प्रकरणी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सीबीआय, इडी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सुरू असलेल्या तपासावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचा दावा आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील आठ निवृत्त अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे माजी पोलिस महासंचालक एम. एन. सिंग, पी. एस. पसरिचा, डी. के. शिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथुर व के. सुब्रमण्यम तसेच माजी मुंबई पोलिस आयुक्त डी. एन. जाधव व माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांचा याचिकादारांमध्ये समावेश आहे.

टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणार्‍या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आल्यानंतर फेक टीआरपीच्या चौकशीची जबाबदारी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणार्‍या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला होता. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता. याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या चालकांना अटक करण्यात आली आहे.

विधीमंडळातील हक्कभंग प्रस्ताव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्र विधीमंडळाने आतापर्यंत दोनवेळा अर्णब गोस्वामीला हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली आहे. विधीमंडळाने गोपनीयतेच्या अटीवर दिलेले कार्यवृत्त परवानगीशिवाय न्यायालयात सादर केल्याचा आरोप आहे. त्यांनी दोनवेळी विधीमंडळाचा हक्कभंग केल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. या हक्कभंग प्रस्तावावर विधानसभा विशेषाधिकार समितीसोबतच्या प्राथमिक बैठकीत विचारविनिमय करण्यासाठी बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -