मॅक्सी घालून घरफोडी करणार्‍याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

hidden camera found in women's toilet
प्रातिनिधिक फोटो

महिलांची मॅक्सी घालून आणि चेहर्‍यावर माकड टोपी लावून गोरेगाव परिसरात घरफोडी करणार्‍या एका रेकॉर्डवरील आरोपीस सीसीटीव्ही फुटेजवरुन कुठलाही पुरावा नसताना गोरेगाव पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. त्याच्या अटकेनंतर त्याच्याकडून चोरीचा माल विकत घेणार्‍या त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. दरोडेखोर गणेश गुरव आणि त्याचा दिलीप भंडारी या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील गणेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने गेल्या काही दिवसांत गोरेगाव परिसरात त्याने अकरा घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांतील सुमारे 25 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल गणेशसह दिलीप भंडारीकडून पोलिसांनी जप्त केला असून दिलीप हा सावकार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिष गोस्वामी यांनी सांगितले.

गेल्या महिन्यांत गोरेगाव येथे राहणार्‍या मनिष मनोहर तावडे यांच्या घरी घरफोडी झाली होती. यावेळी चोरट्याने कपाटातील सुमारे साठ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेले होते. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता. गेल्या दीड वर्षांत गोरेगाव येथील मोतीलाल नगर, उन्नतनगर आणि यशवंत नगरात अशाच काही घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. घरफोडीच्या वाढत्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. या चोरट्याला पकडणे पोलिसांसाठीही आव्हान ठरले होते. या आरोपीच्या अटकेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिष गोस्वामी यांच्या पथकाने शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर एक व्यक्ती मॅक्सी घालून तसेच ओळख पटू नये म्हणून चेहर्‍यावर माकड टोपी घालून रात्रीच्या वेळेस संशयास्पद फिरताना दिसून आली होती.

दोन वर्षांपूर्वी अशाच फुटेजमध्ये ही व्यक्ती दिसून आली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन गोरेगाव येथील मिठानगर, राजीव गांधी गार्डन परिसरातून गणेश गुरव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली देताना गेल्या दिड वर्षांत गोरेगाव परिसरात अकराहून अधिक घरफोडी केल्याचे सांगितले. चोरीचे दागिने तो सावकार दिलीप भंडारीकडे सोपवित होता. त्याची विक्री करुन तो स्वत:ला कमिशन ठेवून उर्वरित रक्कम गणेशला देत होता. त्यानंतर दिलीपला पोलिसांनी अटक केली.

या दोघांकडून पोलिसांनी 750 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, लगड, 50 ग्रॅम चांदीचे दागिने आणि एक पितळी भांडी असा सुमारे 25 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस तपासात गणेशला नऊ वर्षांपूर्वी कळवा पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली होती. त्यानंतर घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला नागपाडा एटीएस अधिकार्‍यांनी अटक केली होती. या दोन्ही गुन्ह्यांत तो नंतर जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर बाहेर येताच त्याने गोरेगाव परिसरात घरफोडी करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी पकडू नये म्हणून तो मॅक्सी आणि माकड टोपीचा वापर करीत होता.