आरेमधील आगीत संशयाचा धूर

आग लागण्यात आलेला परिसर हा खासगी असून, त्याचा नॅशनल पार्कशी कोणताही संबंध नाही. या आगीत लहानलहान झाडे खाक झाली असली तरी यामध्ये कोणत्याही प्राण्यांना इजा झालेली नाही. ही आग लावली असण्याची शक्यता आहे. - संजय कांबळे, सहाय्यक वन संरक्षक, नॅशनल पार्क

mumbai
गोरेगावमधील आरे कॉलनी

गोरेगावमधील आरे कॉलनीतील जंगलात सोमवारी रात्री लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीने विझली. मात्र आता या आगीमधून संशयाचा धूर बाहेर पडू लागला आहे. ही आग नॅशनल पार्कला लागूनच असलेल्या खासगी मालकीवरील जंगलाला लागली आहे, या आगीशी वन विभागाचा काहीच संबंध नसल्याचा दावा वन विभागाकडून करण्यात येत आहे. तर ही आग लागली नसून लावण्यात आल्याचा संशय वनविभाग, अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही आग कशासाठी लावण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

गोरेगावमधील नागरी निवारा परिषद मार्गावरील म्हाडा कॉलनीच्या पाठीमागे असलेल्या खासगी जमिनीवरील जंगलाला सोमवारी रात्री लागलेल्या आगीत तीन ते चार किलोमीटरच्या परिसरातील झाडे जळून खाक झाली. या आगीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. मात्र आग लागलेल्या जंगलाशी वन विभागाचा काहीच संबंध नसल्याचा दावा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे. खासगी मालकीच्या जंगलाला आग लागल्याचे कळताच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विभागाच्या 40 कर्मचार्‍यांनी आग विझवण्यासाठी तातडीने धाव घेतली. आग विझवण्यासाठी कर्मचार्‍यांनी धाव घेतली असली तरी ही आग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत पोहचू नये यासाठी वन विभागाकडून सतर्कतेची काळजी घेण्यात आली होती, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. ही आग खासगी जमिनीवर लागलेली असल्याने त्यासंदर्भात कोणतीही तक्रार आम्ही पोलिसांकडे केलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आग लागलेला भाग हा खासगी मालकीचा असून, या जागेला भलेमोठे कुंपण घालण्यात आले आहे. या जागेमध्ये कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे ही आग लागलेली नसून जाणीवपूर्वक लावली असल्याचा संशयही वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला. वन विभागाप्रमाणेच ही आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करणार्‍या अग्निशमन दलाकडूनही ही आग लावली असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हा संपूर्ण भाग जंगलाचा व खासगी असल्याने या भागातून कोणत्याही प्रकारच्या विद्युत तारा गेलेल्या नाहीत. त्यामुळे शॉर्टसर्कीट होऊन आग लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तीन ते चार किलोमीटर परिसरात पसरलेल्या या आगीत अनेक लहान झाडे व गवत खाक झाले. ही आग रात्रीच्या अंधारात जाणीवपूर्वक लावण्यात आली असावी असा संशयही अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी वर्तवला.

आम्ही रोज या परिसरात बकरींना फिरवण्यासाठी आणतो. सोमवारी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत आम्ही डोंगरावर बकरी फिरवल्या. पण त्यावेळी खासगी जागेमध्ये आम्हाला कोणीही फिरताना दिसले नाही. परंतु त्यानंतर आम्ही बकरी घेऊन घरी गेलो. रात्री उशीरा ही आग लागली असली तरी ही आग लावण्यात आली असावा असा संशय असल्याचे नागरी निवारा येथे राहणार्‍या मोहम्मद असलम शेख याने सांगितले.

चौकशीची मागणी
जंगलाला लागलेल्या आगीबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संशय व्यक्त केला आहे. आगीची तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही कदम यांनी केली आहे. यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केल्याचे कदम यांनी सांगितले.

कशी विझवली आग
आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. परंतु आग जंगलात असल्याने व सभोवती कुंपण असल्याने आगीपर्यंत पोहचणे शक्य नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या 100 जवानांनी आग पसरू नये यासाठी झोडपून आग रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यावर पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्यात आली. आग भीषण असल्याने तिला विझवण्यासाठी बोरिवलीपासून वांद्रेपर्यंतच्या अग्निशमन केंद्रातील सर्व जवानांना पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाचे 16 बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

दारुड्यांचा अड्डा
आग लागलेल्या परिसराला भिंतीचे कुंपण घालण्यात आले असले तरी कुंपणाच्या बाहेरील जंगलाच्या परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिसरातील मद्यपी दारूचे सेवन करण्यासाठी रात्रीच्या वेळी येत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here