आयडॉलचे संचालकपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

आयडॉलच्या पूर्णवेळ संचालकपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर आयडॉलच्या उपसंचालकपदी डॉ. मधुरा कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे.

idol

अनेक वर्षांपासून प्रभारी संचालकाच्या माध्यमातून कारभार चालवला जात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला (आयडॉल) अखेर कायमस्वरुपी पूर्णवेळ संचालक मिळाले. आयडॉलच्या पूर्णवेळ संचालकपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर आयडॉलच्या उपसंचालकपदी डॉ. मधुरा कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या संचालक पदासाठी नुकत्याच ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. प्रकाश महानवर यांची आयडॉलच्या पूर्णवेळ संचालकपदी निवड करण्यात आली. महानवर हे पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ. प्रकाश महानवर हे शिक्षण क्षेत्रात २८ वर्षांपासून कार्यरत असून मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील पॉलिमर आणि सरफेस इंजिनिअरिंग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तेथे ते मानव संसाधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही कार्यरत होते. डॉ.प्रकाश महानवर यांनी केमिकल व प्लास्टिक टेक्नॉलॉजी मधून बीएससी व एमएस्सी केले असून पॉलिमर क्षेत्रात पीएचडी केली आहे. त्यांच्या नावे पॉलिमर क्षेत्रात संशोधनपर ५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट्स असून २ पेटंट्ससाठी अर्ज केलेला आहे.

डॉ. प्रकाश महानवर

आजपर्यंत त्यांनी ११२ संशोधनपर शोधनिबंध लिहिले असून यातील अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत ३२ संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून ९ विद्यार्थी पीएचडी करीत आहेत. अनेक राष्ट्रीय उद्योगासाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही कार्य केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहेत. महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ सायन्स व द कलर सोसायटीचे ते फेलो आहेत. आयडॉलला पूर्णवेळ संचालक मिळावा यासाठी सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांच्याकडून दोन सिनेटमध्ये स्थगन प्रस्ताव मांडले होते.

आयडॉलच्या उपसंचालकपदी डॉ. मधुरा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. त्या पूर्वी आयडॉलमध्येच सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्या आयडॉलच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या प्रभारी म्हणून कार्य करीत होत्या.

आयडॉलमध्ये विविध उपक्रम राबविणार

नवनियुक्त संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी आयडॉलमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. यामध्ये कौशल्यावर आधारित नविन पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाईन सुविधा उपलब्ध करणे. आयडॉलचे ऑटोमेशन करणे, विविध महाविद्यालयात आयडॉलची केंद्रे सुरू करणे, शैक्षणिक मार्गदर्शनासाठी आभासी वर्ग सुरू करणे असे अनेक शैक्षणिक व विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.