घरमुंबईबविआत फूट पाडण्यासाठी युतीची रणनिती

बविआत फूट पाडण्यासाठी युतीची रणनिती

Subscribe

बहुजन विकास आघाडीचे नेते निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षात फूट पाडण्याची खेळी करायचे. पण, यंदा मात्र, शिवसेनेने बविआचाच आमदार फोडून बविआ फोडण्याची कामगिरी केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

वसई विरारवर निर्विवाद सत्ता असलेल्या बविआचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर निवडणुकीत विरोधकांमध्ये फूट पाडण्यात यशस्वी होतात असेच चित्र होते. प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधक बविआत जायचा हा जणू नियमच बनून गेला होता.

- Advertisement -

पण, शिवसेनेने हा नियम आता मोडायला घेतला आहे. गेल्या आठवड्यात बविआचे बोईसरचे आमदार विलास तरे यांना शिवबंधन बांधून शिवसेनेने मोठा धक्का दिला. आताच्या इतिहासात आमदार तरे यांच्या निमित्ताने बविआत फूट पडलेली ही मोठी घटना मानली जाते. तरे हे बविआचे बोईसरमधील हुकुमाचे एक्के. याठिकाणी बविआकडे तरे यांच्याशिवाय पर्यायी खमक्या उमेदवार नाही. तरे यांच्या जाण्याने बविआला बोईसरमध्ये मोठा झटका बसलेच, त्याचबरोबर बविआतील नाराजांना बाहेर पडण्याची हिंमत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तरे यांची कमी भरून काढून शिवसेनेले शह देण्यासाठी बविआने शिवसेनेचे पदाधिकारी आणि कोकण विकास पाटबंधारे महामंडळाचे अध्यक्ष जगदीश धोडी यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुुरु केले आहेत. धोडी बोईसर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. तरे यांच्या सेना प्रवेशाने धोडी यांना उमेदवारी मिळणे आता अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे नाराज धोडी यांना पक्षात घेऊन तरे यांच्याविरोधात मैदानात उतरवण्याचे डावपेच बविआकडून आखले जात आहेत.

- Advertisement -

दुसरीकडे, मागील लोकसभा निवडणुकीत बविआकडून उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेला टारगेट केलेे गेल्याने शिवसेनेने वसईवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपाचे किरीट सोमय्या यांना ज्याप्रमाणे शह दिला गेला त्याच पद्धतीने बविआ आणि हितेेंद्र ठाकूर यांना शह देण्याचा निश्चय खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. म्हणूनच नालासोपारा मतदारसंघाची मागणी करून चकमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मैदानात उतरवण्याचा डाव रचण्यात आला आहे. शर्मा यांच्या माध्यमातून वसईत बविआमध्ये फूट पाडण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार विलास तरे यांना शिवबंधन बांधण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या आगरी सेनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी बहुजनचे आणखी बरेच जण युतीच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे. बविआत प्रचंड नाराजी असून योग्य पर्याय म्हणून तरे यांच्यापाठोपाठ ही मंडळी युतीत येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघात बविआचा पराभव करून युतीचे उमेदवार निवडून येतील, असा पाटील यांचा दावा आहे.

बविआत फूट पाडण्यासाठी युतीची रणनिती
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -