पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार

आमदार आनंद ठाकूरांचे पुत्र भाजपच्या वाटेवर

Mumbai
BJP-and-NCP-11

गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांच्या मुलासह डहाणूतील दोन नगरसेवक, काही पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच भाजपाच्या वाटेवर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते भाजपमध्ये प्रवेश करून विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवतील असे सांगितले जात होते. मात्र, भाजपमधून तिकीट मिळणे अवघड असल्याचे लक्षात आल्याने भुसारा यांनी आता राष्ट्रवादीच्या तिकीटावरच निवडणूक लढवणार निर्णय घेतला आहे. त्यामुळे भुसारा यांचा भाजप प्रवेश टळला आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार आनंद ठाकूर यांचे चिरंजीव, जिल्हा युवा अध्यक्ष करण ठाकूर, उपाध्यक्ष अमित चुरी, नगरसेवक मिहीर शाह, नगरसेवक राजू माच्छी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांसह पक्षाचे पदाधिकारीही लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. आमदार आनंद ठाकूर यांनी उघडपणे प्रवेशाचा निर्णय घेतला नसला तरी त्यांचे पूत्र आणि समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने त्यांचाही प्रवेश होणार असल्याचे निश्चित मानले जाते. राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढणार आहे.

आनंद ठाकूर यांचे पूत्र आणि समर्थक भाजपात गेले आहेत. त्यामुळे आमदार ठाकूरही राष्ट्रवादीत राहतील असे वाटत नाही. गणेश नाईकांचे चिरंजीव ज्या पद्धतीने भाजपात गेले आणि नंतर नाईकांचा प्रवेश झाला तसाच प्रकार येथे होईल. मी मात्र राष्ट्रवादीतच असून विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
-सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

आमदार आनंद ठाकूर आणि आम्ही भाजपात जावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आमदार ठाकूर यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मी स्वतः अद्याप प्रवेश घेतलेला नाही. पण, पालकमंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच भाजप प्रवेशासाठी अनुकुल आहेत. लवकरच निर्णय घेऊ.
-करण ठाकूर, युवा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते भाजपात येण्यास इच्छुक आहेत. पालकमंत्र्यांसोबत अनेकजण संपर्कात आहेत. टप्प्याटप्प्याने प्रवेश होईल.
-प्रशांत पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष