घरमुंबईगिरगाव येथे सेंट्रल प्लाझा सिनेमागृहाच्या मॅनेजवर हल्ला

गिरगाव येथे सेंट्रल प्लाझा सिनेमागृहाच्या मॅनेजवर हल्ला

Subscribe

मुख्य आरोपीसह दोघांना अटक व पोलीस कोठडी, तिकिट ब्लॅक करण्यास विरोध केला म्हणून सुपारी दिली

सिनेमाची तिकिट ब्लॅक करण्याच्या वादातून सेंट्रल प्लाझा सिनेमागृहाच्या मॅनेजवरच सुपारी देऊन प्राणघातक हल्ला करणार्‍या मुख्य आरोपीसह दोघांना व्ही. पी. रोड पोलिसांच्या एका विशेष पथकाने कुठलाही पुरावा नसताना शिताफीने अटक केली. इस्माईल मंसुर अली आणि प्रेमकुमारसिंग उग्गनसिंह राजपूत ऊर्फ प्रेम मेंटल अशी या दोघांची नावे आहेत. यातील प्रेम मेंटल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून बलात्काराच्या गुन्ह्यांत दहा वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आला होता तर इस्माईलने त्याला 50 हजार रुपयांची सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव मोरे यांनी दुजोरा दिला आहे. तिकिट ब्लॅकवरुन एका सिनेमागृहातील मॅनेजरवर तिकिट ब्लॅक करणार्‍या व्यक्तीने सुपारी देऊन हल्ला घडवून आणण्याची ही बहुधा पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते.

लुईस युजीन फर्नांडिस (54) हे ताडदेव येथील एम. पी. रफिक कंपाऊंड, आशीर्वाद इमारतीमध्ये राहतात. ते सध्या गिरगाव येथील सेंट्रल प्लाझा सिनेमागृहात मॅनेजर म्हणून काम करीत आहे. गेल्या महिन्यात ते गिरगाव येथील एका चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. प्रार्थना संपल्यानंतर ते तेथून निघाले. यावेळी मागून येणार्‍या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. हल्ल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला होता. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव मोरे यांच्यासह व्ही. पी रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

- Advertisement -

२३ टाके पडले
जखमी लुईस यांना पोलिसांनी तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची दुखापत गंभीर होती, त्यामुळे त्यांच्यावर 23 हून अधिक टाके पडले होते. याप्रकरणी व्ही. पी रोड पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने शनिवारी प्रेमकुमारसिंग याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्यानेच लुईस यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची कबुली देऊन त्यासाठी त्याला 50 हजार रुपयांची सुपारी इस्माईल अली याने दिली होती. या माहितीनंतर गिरगाव येथून इस्माईल अली याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. लुईस यांच्या चौकशीतून पोलिसांना कुठलीही माहिती मिळत नव्हती. मात्र या दोघांच्या चौकशीतून आलेल्या माहितीने पोलिसांना धक्काच बसला होता.

मॅनेजर म्हणून कार्यरत
लुईस हे पूर्वी चर्नीरोड येथील रॉक्सी सिनेमागृहात मॅनेजर म्हणून काम करीत होते. यावेळी तिथे इस्माईल हा तिकिटांची ब्लॅक करीत होता. मात्र ही माहिती समजताच त्यांनी इस्माईला समज देऊन तिथे सिनेमांच्या तिकिटांची ब्लॅक करु नकोस, नाहीतर पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे इस्माईलने सेंट्रल प्लाझा सिनेमागृहात तिकिटांची ब्लॅक करण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान लुईस हे रॉक्सी सिनेमागृहाचे काम सोडून सेंट्रल प्लाझा सिनेमागृहात मॅनेजर म्हणून रुजू झाले होते. तिथेही त्यांना इसमाईल तिकिटांची ब्लॅक करताना दिसून आला. त्यानंतर त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती.

- Advertisement -

सूड म्हणून रचला कट
लुईस यांच्यामुळे रॉक्सी आणि आता सेंट्रल प्लाझा सिनेमागृहातील इस्माईलचे काम बंद झाले होते, त्याचा सूड म्हणून इस्माईलने कट रचून लुईस यांच्यावर जिवघेणा करण्याचा कट रचला होता. याच दरम्यान त्याची ओळख प्रेम मेंटल याच्याशी झाली होती. त्याला घडलेला प्रकार सांगून त्याने त्याला हल्ल्यासाठी 50 हजार रुपयांची सुपारी दिली होती. ही सुपारी मिळताच प्रेम मेंटल हा फेब्रुवारी महिन्यांत गिरगाव परिसरात आला होता. चर्चमधून प्रार्थना करुन लुईस हे बाहेर येताच त्याने त्यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने मागूनच वार केले होते. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. मात्र कुठलाही पुरावा नसताना या दोघांनाही पोलिसांनी शिताफीने अटक केली.

प्रेम मेंटल रेकॉर्डवरील गुन्हेगार
या कटाचा मुख्य सूत्रधार इस्माईल असून प्रेम मेंटल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यात तो दहा वर्षे कारागृहात होता. अलीकडेच तो कारगृहातून बाहेर आला होता. त्याला पैशांची गरज होती, त्यामुळे त्याला लुईस यांच्यावर हल्ल्याची सुपारी मिळताच त्याने इस्माईलच्या सांगण्यावरुन हा हल्ला केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -