बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधीची प्रॉपटी बळकावण्याचा प्रयत्न

Mumbai
arrest
अपहरणासह विनयभंग व पोस्कोच्या गुन्ह्यांत आरोपीस अटक

बोगस कागदपत्रांच्या आधारे सांताक्रूझ येथील सुंदरनगर परिसरात असलेली कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका बिल्डरला शुक्रवारी फसवणुकीसह अन्य भादंवि कलमांतर्गत वाकोला पोलिसांनी अटक केली. अबिदअली मुस्ताक तानाजी (४३) असे या बिल्डरचे नाव असून तो सध्या सांताक्रूझच्या कालिना, गरीब नवाज अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे या गुन्ह्यांतील तक्रारदार रॉक लुईस डिसोझा हा त्याच्याच पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यांत सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या लेखी अर्जावरुन या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या कटात तक्रारदाराचा भाऊ जोसेफ लुईस डिसोझासह इतरांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका आरोपीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते. तक्रारदार रॉक डिसोझा यांची सांताक्रूझ येथील सुंदरनगर, केईएस शाळेसमोर एक प्रॉपर्टी आहे. या जागेचे मूळ मालक बेन्झिल पॉलीकॉर्प असून 1950 पासून या जागेमधील बंगला आणि तीन बांधकाम रॉक यांचे वडील लुईस डिसोझा यांच्या मालकीचे आहे. या जागेमधील तीन रुम उत्पल गोम्स, भानुशाली लक्ष्मीदास जटाबाई आणि छोटूलाल कन्होजिया यांना भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. मात्र ते तिघेही त्यांना भाडे देत नव्हते, त्यातच उत्पल गोम्स यांनी त्यांच्या राहत्या रुममध्ये नर्सरी आणि बेबी सिटींग चालू केल्यामुळे रॉक डिसोझा यांनी त्यांच्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रॉपटीचे वारसदार म्हणून लुझ्झा लुईस डिसोझा, जोसेफ लुईस डिसोझा, रॉकी लुईस डिसोझा, फातिमा जोजेक डिसोझा, ग्रेसा किटकी कॉर्टस यांची नोंद झाली होती. त्यापैकी लुझ्झा, त्यांची आई फातिमा आणि त्यांची बहिण ग्रेसा कॉर्टस यांचे नंतर निधन झाले.

सध्या या प्रॉपटीचे मालक रॉक आणि त्यांचा भाऊ जोसेफ हे असून जोसेफ हा काही वर्षांपूर्वीच मंगलोर येथे स्थायिक झाला होता. 17 ऑक्टोंबर 2018 रोजी या प्रॉपर्टीवर अबीदअली मुस्ताक तानाजी यांनी कब्जा करुन ही प्रॉपर्टी बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. हत्येच्या गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना रॉक डिसोझा यांनी विशेष सेशन कोर्टात त्यांच्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांचे तसेच वस्तुबाबत पंचनामा करण्याची विनंती केली होती. त्यावेळी अबीदअली आणि जोसेफ यांनी बोगस कागदपत्रे बनवून ही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर त्यांच्या घरातून सुमारे सव्वादोन लाख रुपयांचे साहित्य चोरी केले होते. रॉक यांचा भाऊ जोसेफ यानेच अबीदअलीशी संगनमत करुन जागेचे बोगस कागदपत्रे बनवून ती जागा अबीदअलीला विकून रॉक डिझोसा यांची फसवणुक केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here