घरमुंबईलोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयत्न असफल?

लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयत्न असफल?

Subscribe

चाचणी अपयशी, दोन कोटी रुपयांचा चुराडा

मुंबईतील लोकल गाड्यांमधून पडून अपघाती मृत्यू होण्याची संख्या पाहून जागतिक बँक आणि न्यायालय यांनी रेल्वे प्रशासनाला यावर उपाय म्हणून सर्व लोकल गाड्यांना स्वयंचलित बंद व उघडणारे दरवाजे बसवण्याचा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाकडून 2008सालापासून लोकल गाड्यांना असे स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र त्याला १२ वर्षे झाली तरीही रेल्वे प्रशासनाला लोकल गाड्यांचे दरवाजे बंद करणे शक्य झालेले नाही. मात्र प्रशासनाचे यासाठीच्या खटाटोपातून सर्व सामान्य प्रवाशांचे कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत.

पश्चिम रेल्वे अनेक वर्षांपासून लोकल गाड्यांमध्येही ऑटोमॅटिक क्लोजिंग डोअर्स (स्वयंचलित दरवाजे) बसविण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र याला यश मिळत नाही. नुकतेच पश्चिम रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर सिमन्स लोकलच्या तीन डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवले होते. त्याची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच टप्याटप्प्याने उपनगरीय सर्व साध्या लोकलगाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली होती. मात्र चाचणीच्या वेळी या स्वयंचलित दरवाजांमध्ये अनेक अडचणी आल्या. प्रवाशांना श्वास घेतानाही अडचणी येऊ लागल्या. या दरवाजांमुळे डब्यात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढून प्रवाशांना गुदमरायला होत असल्याचे चाचणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेची स्वयंचलित दरवाजांची चाचणी अयशस्वी ठरली. रेल्वे आधुनिक झाल्याचा आव आणते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वेला लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवता आले नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- Advertisement -

शक्य आहे, पण इच्छा शक्ती नाही
लोकलमधून पडून होणारे अपघात किंवा फटका गँगचे प्रवाशांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवून त्याची चाचणी घेण्याचा प्रयत्न रेल्वेकडून सतत सुरु असतो, मात्र हा प्रकल्प यशस्वी होत नाही. याला रेल्वेचे अभियांत्रिक अधिकारी दोषी आहेत. कारण त्यांची इच्छा शक्ती नाही. इच्छा शक्ती असेल तर नक्कीच ऑटोमॅटिक क्लोजिंग डोअर्स प्रकल्प यशस्वी होईल. भारतीय रेल्वे जम्मू, काश्मीरमध्ये जगातील सर्वाधिक उंच रेल्वे पूल बांधत असताना मुंबईतील लोकलगाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात अपयश येते, ही हस्यास्पद बाब आहे. म्हणून रेल्वे मंत्र्यांनी याकडे गांभीर्याना लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया रेल यात्री परिषद सुभाष गुप्ता यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली आहेत.

सध्या लोकल गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक क्लोजिंग डोअर्स चाचणी घेतली होती. चाचणीत काही अडथळे निर्माण झाले आहेत. त्यांचा अभ्यास करुन त्यातील अडचणी दूर करून यासंबंधीची चाचणी पुन्हा घेण्यात येईल.
– जी.व्ही.एल. सत्यकुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -