औरंगाबादेत चौरंगी लढतीमध्ये खैरेंची परीक्षा

Mumbai

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे सलग चार वेळा निवडून आले आहेत. २०१९मध्येही खैरे हे प्रमुख दावेदार आहेत. २०१४ मध्ये मोदी लाट होती, त्या लाटेत खैरे यांना सहज निवडून येता आले. परंतु यावेळी त्यांच्यासमोर बरीच आव्हाने आहेत. खैरे यांच्या विरोधात एमआयएमचे इम्तियाज जलील, काँग्रेसचे सुभाष झांबड आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. खैरे यांच्या विरोधात जेवढे म्हणून हे सर्व प्रतिस्पर्धी आहेत. ते सगळेच जण ‘आमची लढाई खैरे यांच्याच विरोधात आहे’, असे सांगत आहेत. म्हणून खैरे यांची यंदाची परीक्षा कठीण झाली आहे. निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात अर्थात २३ एप्रिल रोजी औरंगाबाद येथे मतदान होणार आहेत. मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना अद्याप या मतदारसंघातील चित्र सुस्पष्ट होत नाही.

विशेषत: खैरे यांना सर्वात जास्त धोका हा आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यापासून आहे. औरंगाबादचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला होता. मात्र दिलजमाई झाल्यानंतर सत्तार यांनी अर्ज मागे घेतला. परंतु हर्षवर्धन जाधवांना त्यांनी पाठिंबा दिला. मध्यंतरी रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटले होते. हर्षवर्धन यांनीही आपण निवडून आल्यास नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भेटीचा आणि सत्ताधार्‍यांच्या पाठिंब्याचा काही संबंध आहे का, याची देखील कुजबुज सध्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. तसेच जाधव यांना शांतिगिरी महाराजांनीही पाठिंबा दिला आहे. शांतीगिरी महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातील हिंदू धर्मीयांचे मोठे शक्तीस्थान मानले जाते. सत्तार आणि शांतिगिरी महाराजांच्या पाठिंब्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना फायदा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. आमदार जाधव यांचा प्रभाव हा मुख्यत: ग्रामीण मराठा मतदारांवर आहे. त्या जोरावर खैरे यांच्या मतांमध्ये फरक पडू शकतो.

तसेच आमदार इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांना मुसलमान आणि दलित समाजाची ६० ते ७० टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी सध्या मुस्लीम समाजात त्यांच्याविषयीची नाराजीही आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुस्लीम समाजाची एमआयएमला भरभरून मते मिळणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. परंतु खैरे यांच्या वाट्यातील मुस्लीम आणि दलित मतांचाही फटका बसेल. शहरातील कचरा, पाणी समस्या आणि ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची केंद्र आणि राज्य सरकारविरुद्धची नाराजी याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार झांबड यांना होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रचारात उतरल्याने काँग्रेसचे झांबड यांची बाजू भक्कम झाली आहे. मतांची विभागणी आणि जातीय ध्रुवीकरण कसे होते, यावर या चौरंगी लढतीचे भवितव्य अवलंबून आहे.

१९५१ पासून १९८४ पर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर काँगे्रेसचा झेंडा फडकत होता. मधल्या काळात १९७७ मध्ये भारतीय जनता पक्षाने या जागेवर विजय मिळवला होता. १९८९ पासून मात्र २०१४ पर्यंत या ठिकाणी केवळ शिवसेनेचा खासदार निवडून आला. १९९८ मध्ये मात्र एकदा काँग्रेसचा खासदार निवडून आला होता. विशेष म्हणजे १९९९ पासून सलग चार निवडणुकांमध्ये या ठिकाणी शिवसेनेेचे चंद्रकांत खैरे निवडून आले आणि २०१९ मध्येही शिवसेनेने पुन्हा एकदा खैरे यांनाच उमेदवारी दिली आहे. परंतु यावेळी त्यांच्या विरोधात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड तसेच एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील, तसेच शिवसेनेचे बंडखोर, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here