ललित कला अकादमीतर्फे ‘राष्ट्रीय अकादमी पुरस्कारां’ची घोषणा

यंदा मुंबईत होणाऱ्या ६० व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कलावंत आणि कलाकृतींचा गौरव करण्यात येणार आहे.

Mumbai
ललित कला अकादमी

यंदा मुंबईत होणाऱ्या ६० व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कलावंत आणि कलाकृतींचा गौरव करण्यात येणार आहे. प्रतिभावंत कलाकार आणि कलांचा गौरव करून त्यांना राष्ट्रीय मान्यता देणारे हे व्यासपीठ असून या व्यासपीठाच्या माध्यमातून देशभरातील पंधरा कलावंतांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याची माहिती कला अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी दिली. ते आज, शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या कला मेळाव्यात प्रदर्शित सर्व चित्रे, शिल्प आणि इतर कलाकृती सौदर्यदृष्टी आणि कलाविष्कारासाठी वापरलेल्या माध्यमांचा वापर या कसोट्यांवर अग्रगण्य आणि सर्वोत्तम आहे. या प्रदर्शनात पेंटिंग, ड्रॉईंग, मूर्तिकला, ग्राफिक, छायाचित्रे आणि मिश्रीत माध्यमांच्या कलाकृती अशी व्यापक विविधता आपल्याला पहायला मिळणार आहे. निर्मितीची गुणवत्ता, वापरलेल्या प्रतिमांचा ताजेपणा, त्यासाठीची माध्यमे, त्यांचे नवे प्रयोग आणि रंगांचा वापर या निकषांवर कलाकृतीची निवड करण्यात आली असल्याचे पाचारणे म्हणाले.

विविध राज्यांतील कलावंतांचा सन्मान 

पंधरा कलावंतांना राष्ट्रीय अकादमीचा पुरस्कार घोषित झाला असून एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. पुरस्कारप्राप्त कलावंतामध्ये चंदन कुमार समल – ओडिसा, गौरी वेमुला – तेलंगणा, हेमंत राव – मध्यप्रदेश, हिरेनकुमार पटेल – गुजरात, जया जेना – ओडिसा, जयेश केके- केरळ, जितेंद्र सुतार – महाराष्ट्र, डगलस जॉन – महाराष्ट्र, प्रतापचंद्र चक्रवर्ती – पश्चिम बंगाल, रश्मी सिंह – उत्तर प्रदेश, सचिन चौधरी – महाराष्ट्र, सुनील कुमार – विश्वकर्मा, तबस्सुम खान – बिहार, वासुदेव कामत – महाराष्ट्र आणि विनिता चेनगावंकर – गोवा यांचा समावेश आहे.

२५ मार्च रोजी पुरस्कार सोहळा 

या प्रदर्शनाचे आणि कलामेळ्याचे उद्धाटन तसेच पुरस्कारांचे वितरण गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याहस्ते २५ मार्च २०१९ रोजी करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार, बाबा योगेंद्र आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कला मेळाव्यात १२० स्टॉल असणार आहेत, देशभरातील पेटींग, मूर्तीशिल्प, मिश्रीत माध्यमासह अनेक माध्यमांच्या कालकृती रसिकांना पाहता येणार असून हे प्रदर्शन सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणिं राष्ट्रीय आधुनिक कला गॅलरी येथे २५ मार्च ते ८ एप्रिल २०१९ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहितीही पाचारणे यांनी यावेळी दिली.