मुंबईकरांना धबधब्यांची चाहूल

waterfall
(फोटो प्रातिनिधिक आहे)

रिमझिम पावसाला सुरुवात झाली का? उत्सुकता लागते ती पावसाळी पिकनिकला जाण्याची. हिरवा शालू पांघरलेल्या निसर्गाला जवळून पाहण्याची एक वेगळीचा मज्जा असते, ही मज्जा अनुभवता येऊ शकते, तेही मुंबईपासून जवळपास असलेल्या परिसरात. मुंबईहून काही तासाच्या अंतरावर अशी काही ठिकाणे आहेत. जिथे आपण एक दिवसीय पिकनिकचा आनंद घेऊ शकतो. चला तर मग पाहूया मुंबईच्या जवळील अशी काही पिकनिकची स्थळ जिथे आपण दुधासारखे दिसणारे मोती अंगावर घेऊन आनंद लूटू शकतो.

पळसदरी : हे ठिकाण मुंबई-पुणे महामार्गावरुन १८ किमी दूर आहे. हा धबधबा पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर आहे. या ठिकाणी आपण रेल्वेने देखील जाऊ शकतो. येथे गावकर्‍यांना सांगितल्यास ते जेवणाची उत्तम सोय देखील करतात. त्यामुळे या धबधब्याला मोठी पसंती असते.

bhivpuri
भिवपुरी धबधबा

भिवपुरी : कर्जतपासून काही अंतरावर असलेल्या भिवपुरी धबधब्यावर जास्त करुन कॉलेज्या विद्यार्थांची गर्दी दिसून येते. या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी येथे भरपूर पर्यटक गर्दी करतात. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ पर्यटकांसाठी हॉटेल्सची देखील सोय आहे.

गवळीदेव : नवी मुंबईकरांकरता हाकेच्या अंतरावर गवळीदेव हा धबधबा आहे. घणसोली गावाजवळ असणाराऱ्या या धबधब्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पर्यटक गर्दी करत असतात. हा धबधबा आणि गवळीदेव डोंगर या ठिकाणी पुरेशा अशा सोयी नसल्याने स्वत:ची पूर्ण व्यवस्था करूनच येथे जावे लागते.

kondeshwar waterfall
कोंडेश्वर धबधबा

कोंडेश्वर : बदलापूरपासून ६ किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर हा धबधबा आहे. या ठिकाणी जाण्यासाठी बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली येथून शेअर रिक्षा करावी लागते. या ठिकाणी कुंडात डोह असून त्यात कपाऱ्या असल्याने येथे पाण्यात उतरताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.

तुंगारेश्वर : नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद द्विुगुणीत करायचा असेल तर, तुंगारेश्वरला नक्कीच भेट द्यावी. मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर हा धबधबा आहे. मात्र, पर्यटकांसाठी डोंगरावर कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही. त्यामुळे तुम्हाला स्वत:ची व्यवस्था करूनच जावे लागते.