घरमुंबईपाण्यासाठी बदलापूरकर उतरले रस्त्यावर

पाण्यासाठी बदलापूरकर उतरले रस्त्यावर

Subscribe

पाणी टंचाईने त्रस्त असलेले कात्रप भागातील नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले. पाणी टंचाईमुळे तुलसी आंगण परिसरातील सोसायट्याना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी वर्षाकाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याचा या भागातील रहिवाशांनी निषेध केला.

रविवारी दुपारी माजी नगराध्यक्ष राम पाटकर यांच्या नेतृत्वाखाली तुलसी आंगण व परिसरातील इतर सोसायट्यांच्या रहिवाशांनी पाणी टंचाईचा निषेध करीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.’मेट्रो नको, वायफाय नको, फक्त पिण्यासाठी द्या पुरेसे पाणी, पाणी आहे टँकरला, नाही आमच्या नळाला, पाणी आमच्या हक्काचे, अशा विविध घोषणांचे फलक हाती घेऊन या परिसरातील रहिवासी या आंदोलनात सहभागी झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे ही पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप राम पाटकर यांनी केला. पाण्याचे ऑडिट करून गळती थांबवल्यास पाणी टंचाईची तीव्रता कमी होऊ शकते. परंतु त्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप पाटकर यांनी केला.

- Advertisement -

वर्षभरात टँकरसाठी लाखो रुपयांचा भुर्दंड
तुलसीअंगण सोसायटीमध्ये डिसेंबर 2018 पासून 17 मार्च 2019 पर्यंत पाण्याचे 523 टँकर मागवावे लागले. डिसेंबर महिन्यात 94, जानेवारी महिन्यात 171, फेब्रुवारी महिन्यात 167 तर मार्च महिन्यात 91 पाण्याचे टँकर मागवावे लागले आहेत. वर्षभरात या सोसायटीचे सुमारे साडे तेरा लाख रुपये टँकरवर खर्च होत आहेत. या एकाच सोसायटीला नव्हे तर परिसरातील लहानमोठ्या सुमारे 67 सोसायट्यांना अशा प्रकारे टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाण्याचे बिल भरूनही या सोसायट्याना दरवर्षी लाखो रुपयांचा भुर्दंड नाहक सहन करावा लागत असल्याचे तुलसी आंगण सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -