महापौर आणि आदित्य ठाकरेंच्या मर्जीतल्यांना बाळासाहेब ठाकरे पुरस्कार

सचिन पडवळ उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष तर शरद उघडे, किरण दिघावकर उत्कृष्ट सहाय्यक आयुक्त यांची निवड झाली आहे.

Mumbai
the standing committee rejected garden contractors
उद्यान देखभालींच्या कंत्राटदारांना ‘स्थायी समिती’ने नाकारले

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार्‍या स्वच्छ प्रभागाच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कारसाठी एफ/दक्षिण व उत्तर/ प्रभाग समितीचे अध्यक्ष सचिन पडवळ यांची निवड करण्यात आली. तर उत्कृष्ट सहाय्यक आयुक्त या पुरस्कारासाठी जी/दक्षिण विभागाचे शरद उघडे आणि जी/उत्तर विभागाचे किरण दिघावकर यांची निवड करण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली असून पुढील आठवड्यात महापालिका सभागृहात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. महानगरपालिकेत उत्कृष्ट काम करणारे प्रभाग समिती अध्यक्ष, सहाय्यक आयुक्त, गुणवंत अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांच्याासाठी यावर्षीपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर त्यासाठी महापालिकेने अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या बैठकीत यासर्वांची निवड करण्यात आली.

अन्य प्रभाग समिती अध्यक्षांमध्ये तीव्र नाराजी

महापालिकेने सन २०१८-१९ या कालावधीसाठी हे अर्ज मागवले होते. यामध्ये ५ प्रभाग समिती अध्यक्षांकडून अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी एफ/उत्तर व दक्षिण प्रभाग समितीची या पुरस्कारासाठी निवड होण्याची दाट शक्यता आपलं महानगर तसेच माय महानगरने वर्तवली होती. त्यानुसार, अंतिम विजेत्यांच्या यादीमध्ये प्रभाग समितींमध्ये एफ/उत्तर व दक्षिण प्रभागाची निवड करून अध्यक्ष सचिन पडवळ यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सचिन पडवळ महापौरांच्या विशेष मर्जीतील असल्याने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याने अन्य प्रभाग समिती अध्यक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

आदित्य ठाकरेंचे खास अधिकारी

उत्कृष्ट सहाय्यक आयुक्तपदासाठी जी/दक्षिणचे शरद उघडे आणि जी/उत्तरचे किरण दिघावकर यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकार्‍यांना विभागून पुरस्कार देण्यात येत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. या दोघांच्या नावाला विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी तीव्र हरकत घेतली होती. एच/पश्चिम विभागातून आदित्य ठाकरे यांनी उघडे यांना जी/दक्षिण विभागात बदली करून घेतली आहे. तर ए विभागाचे सहाय्यक आयुक्त असताना दिघावकर यांनी आदित्य ठाकरेंच्या योजनांना मुहूर्त स्वरुप दिले होते. तसेच त्यांच्या मागणीनुसार दिघावकर यांची वर्णी जी/उत्तर प्रभागात लागली होती. त्यामुळे दिघावकर आणि उघडे यांना केवळ आदित्य ठाकरेंच्या विशेष मर्जीतील असल्यामुळेच ही निवड झाल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

झाडे कापणार्‍या परदेशींचाही गौरव

ज्यांच्या कार्यकाळात सर्वांधित झाडे कापण्याचे प्रस्ताव मंजूर झाले अशा उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी उत्कृष्ट गुणवंत अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे घनकचर्‍यासह इतर विभागांमध्ये महत्वाची कामगिरी करणारे अधिकारी असताना परदेशी यांची निवड करण्यात आल्याने एकच नाराजीचा सूर सर्व वर्गांमध्ये आळवला जात आहे. खुद्द विरोधी पक्षनेत्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पुरस्काराची रक्कम वाढणार

उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष-रोख रक्कम ५० हजार रुपये, उत्कृष्टसहाय्यक आयुक्त- ३० हजार रुपये, उत्कृष्ट गुणवंत अधिकारी-३० हजार रुपये, ३ उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी- १० हजार रुपये, ३ उत्कृष्ट गुणवंत कामगार-प्रत्येकी ५ हजार रुपये अशा पुरस्काराचे स्वरुप आहे. परंतु हा पुरस्कार बाळासाहेबांच्या नावाने दिला जात असल्याने यांच्या रक्कमेत वाढ करण्यात येणार आहे. बाळासाहेबांच्या नावाला साजेशी अशी रक्कम या पुरस्कारासाठी दिली जाणार असून पुरस्कार वितरणाच्या वेळी ही रक्कम जाहीर केली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्षांचे नाव
सचिन पडवळ, एफ/उत्तर व एफ/दक्षिण

उत्कृष्ट सहायक आयुक्त
शरद उघडे, जी/दक्षिण
किरण दिघावकर, जी/उत्तर

उत्कृष्ट कर्मचारी
पुजा नाणोसकर, (परिचारिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी), धर्मा कन्हिराम राठोड निरिक्षक(बाजार), नरेश अनंत नाईक मुख्य लिपिक (नायर रुग्णालय)

उत्कृष्ट कामगार
अशोक पांडुरंग ससाणे, श्रमिक देवनार पशुवधगृह, मुल्लाजी रफिक अब्दुल कादिर, रोड रोअर स्वच्छत, जी/उत्तर विभाग, प्रविण अडिवरेकर, हमाल, नायर रुग्णालय


हेही वाचा – ‘करोना’ व्हायरसचा मुंबई पालिका नगरसेवकांना ‘असा’ही फटका!