घरताज्या घडामोडीबाळासाहेब थोरातांनी शिवसेनेला सुनावलं! नामांतरावरून लिहिलं भलंमोठं पत्र!

बाळासाहेब थोरातांनी शिवसेनेला सुनावलं! नामांतरावरून लिहिलं भलंमोठं पत्र!

Subscribe

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यावरून राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जसा सामना सुरू आहे, तसाच तो सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये देखील सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सुरुवातीपासूनच औरंगाबादच्या नामकरणाला विरोध केलेला असून राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे नामांतराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरू असताना आता बाळासाहेब थोरातांनी भाजपसोबतच शिवसेनेला देखील सुनावणारं एक भलंमोठं पत्रच लिहिलं आहे. ‘सत्ता भोगताना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?’ असा सवालच थोरात यांनी या पत्रातून विचारला आहे.

बाळासाहेब थोरातांचं पत्र..जसं आहे तसं…

नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही, औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे.

राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात कडे जनता करमणूक म्हणून बघते आहे.

राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू.

महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. हे सरकार बनविताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -