घरमुंबईवांद्रे-वर्सोवा सी लिंक कोळीवाड्यांच्या मुळावर

वांद्रे-वर्सोवा सी लिंक कोळीवाड्यांच्या मुळावर

Subscribe

सर्वेक्षणाच्या नावाखाली कांदळवनाची कत्तल

वांद्रे-वरळी सी लिंकचा पुढील टप्पा असलेल्या वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले आहे. वर्सोवा-वांद्रे सी लिंकला मुंबईशी जोडण्यासाठी वांद्रे, जुहू कोळीवाडा व वर्सोवा येथे विशेष मार्गिका ठेवल्या आहेत. परंतु वर्सोवा-वांद्रे सी लिंक हा चिंबई कोळीवाडा, जुहू कोळीवाडा, खारदांडा, मोरागाव या कोळीवाड्याच्या अस्तित्त्वावरच घाला घालणारा आहे. जुहू कोळीवाड्याजवळील कांदळवनाची एमएसआरडीसीकडून कत्तल करून तेथे मातीचा भराव टाकून कांदळवनाचे अस्तित्त्वच नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिकांनी याला विरोध केला असता त्यांना धमकी देण्यात येत असल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वर्सोवा-वांद्रे या 17.17 किमी लांबीच्या सी लिंकच्या कामाची नुकतीच एमएसआरडीसीकडून घोषणा करण्यात आली. सी लिंकचे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे कंत्राट रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व अस्ताल्दी या कंपनीला दिले आहे. त्यानुसार सी लिंकला मुंबईशी जोडण्यासाठी वांद्रे, जुहू कोळीवाडा व वर्सोवा येथे मार्गिका उभारण्यात येणार आहेत. या मार्गिकेसाठी भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी चिंबई कोळीवाडा, जुहू कोळीवाडा, खारदांडा, मोरागाव कोळीवाडा या मुंबईच्या भूमिपुत्रांच्या जागेवरच कुर्‍हाड आणण्यात येत आहे. जुहू कोळीवाड्यालगत सी लिंकचे कास्टिंग यार्ड उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -

जुहू कोळीवाड्याचा समुद्र किनारा हा 70 हजार स्क्वेअर मीटर इतका लांब आहे. यातील प्रकल्पासाठी आवश्यक 30 हजार स्क्वेअर मीटर जागेसाठी सर्व्हेक्षण करणार असल्याचे सांगत एम-एसआरडीसीच्या कंत्राटदाराने मोठ्या प्रमाणात कांदळवनांची कत्तल केली आहे. कत्तल केलेल्या कांदळवनाच्या जागेवर तातडीने मातीचा व चिखलाचा भराव टाकून कांदळवनाचे अस्तित्त्वच नष्ट करण्यात येत आहे. कांदळवन तोडण्यासाठी कंत्राटदाराकडून 8 जेसीबी, 12 डम्पर, ५ टँकर अहोरात्र काम करत आहेत. कांदळवन तोडण्यास स्थानिकांकडून विरोध होताच कंत्राटदारांकडून तोडलेली झाडे तातडीने अन्यत्र हलवण्यात आली आहेत. जुहू कोळीवाडा येथे सुनील दत्त उद्यानाच्या बाजूला हे खारफुटीचे क्षेत्र आहे. भरतीच्यावेळी उसळणार्‍या उंच लाटांचे पाणी कांदळवनात शिरते. परंतु एमएसआरडीसीने कांदळवन तोंडून टाकलेल्या भरावामुळे समुद्र व कांदळवनाचा पूर्णत: संबंधच तोडला आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी कांदळवनापर्यंत पोहचणार नाही. परिणामी खाडीमार्गे कांदळवनापर्यंत फार कमी पाणी पोहचून सध्याचे कांदळवनही हळूहळू नष्ट होण्याची शक्यता आहे. कांदळवन तोडण्यास विरोध करणार्‍या नागरिकांनाही कंत्राटदारांकडून धमकी देण्यात येते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

समुद्र किनार्‍याच्या 70 हजार स्क्वेअर मीटर जागेपैकी प्रकल्पासाठी आवश्यक 30 हजार स्क्वेअर मीटर जागा कोणती असेल, याबाबत स्थानिकांना एमएसआरडीसीकडून कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परंतु ज्या पद्धतीने काम सुरू आहे. त्यावरून जुहू कोळीवाड्याचा बहुतांश समुद्र किनारा प्रकल्पासाठी घेण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. कोळीवाड्याचा बहुतांश समुद्र किनारा प्रकल्पासाठी वापरल्यास कोळ्यांच्या उपजीविकेच्या साधनावरच घाला घातला जाईल, अशी भीती स्थानिक कोळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. जुहू कोळीवाड्यातील कोळ्यांची उपजीविकाही समुद्रातून मिळणार्‍या माशांवरच अवलंबून आहे. पण वर्सोवा-वांद्रे सी लिंकसाठी जुहू कोळीवाडा येथे कास्टिंग यार्डसाठी उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -

कास्टिंग यार्डसाठी मोठ्या प्रमाणात कोळीवाड्याचा किनारा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे बोटी उभ्या करण्यासाठी आवश्यक जागा, जाळी विणण्याची जागा, मासे सुकवण्यासाठीचे खळे व लहान मुलांच्या मैदानावर बुलडोझर फिरवण्यात येणार आहे. सी लिंकसाठी बांधण्यात येणार्‍या खांबांमुळे समुद्र किनार्‍यालगतच्या मासेमारीवर परिणाम होण्या-बरोबरच खांबावर बोटी आदळून अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रकल्पाच्या नावाखाली नष्ट करण्यात येणारा समुद्र किनारा, नष्ट होणारी मासेमारी व बोटीला अपघात होण्याची शक्यता यामुळे जुहू कोळीवाड्यातील नागरिकांची उपजीविका नष्ट होऊन स्थानिकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेरोजगारी व समुद्र किनारा नष्ट झाल्यास कोळीवाडाच उद्ध्वस्त होण्याची भीती नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.

उत्सवांवर येणार गदा

समुद्र किनारी बांधण्यात येणार्‍या कास्टिंग यार्डमुळे कोळ्यांचा समुद्राकडे जाण्याचा मार्ग बंद होणार आहे. कोळ्यांचे उत्सव हे समुद्र किनारीच होतात. नारळीपोर्णिमेवेळी काढण्यात येणारी पालखी व दिंडी यार्डमुळे समुद्रावर नेता येणार नाही. त्यामुळे उत्सवांवर गदा येण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्थानिक नागरिक अविनाश साने यांनी दिली.

एकही परवानगी नाही

जुहू कोळीवाड्यालगत समुद्र किनार्‍यावर सी लिंकच्या सुरू असलेल्या कामाबाबत एमएसआरडीसीकडे कोणतीच परवानगी नाही. कोळीवाड्यांचा सर्वे करून सर्व परवानग्या मिळाल्यावरच काम करावे, असे न्यायालयाचे आदेश असतानाही एमएसआरडीसी कोणत्याही परवान्यांशिवाय काम करत आहे. हा न्यायालयाचा अवमान आहे, असा आरोप स्थानिकांनी केला.

जुहू कोळीवाड्यालगतचे कांदळवन तोडल्याच्या तक्रारी आमच्याकडेही आल्या होत्या. त्यानुसार आम्ही वन विभागाला पाहणी करण्यास सांगितले होते. वन विभागाने पाहणी करून 19 नोव्हेंबरला आम्हाला सादर केलेल्या अहवालामध्ये कांदळवन तोडण्यात आले नसल्याचे सांगितले. कांदळवनापासून 50 मीटर जागा सोडूनच आम्हाला काम करायचे आहे. त्यानुसार आम्ही 50 मीटर अंतरावर कुंपण बांधण्याचे काम हाती घेतले आहे. आम्ही पूर्णपणे नियमाने काम करत असून कोणत्याही प्रकारे कांदळवनाची कत्तल करून नियमाचे उल्लंघन केलेले नाही. नागरिकांच्या तक्रारी निवारण्यासाठी शनिवारी त्यांच्यासोबत बैठक ठेवलेली आहे.
-विजय वाघमारे, सह व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -