घरमुंबईबीडीडी चाळीतील रहिवाशांचे करार सुरू

बीडीडी चाळीतील रहिवाशांचे करार सुरू

Subscribe

घराच्या दारातच नि:शुल्क कराराचा पहिला प्रयोग

बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी आता रहिवाशांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची सुरूवात केली आहे. ट्रान्झिट कॅम्पमध्ये करार करण्यासाठी अखेर लोक पुढे येण्यासाठी सुरूवात झाली आहे. गेल्या पंधरवड्यात ५५ रहिवाशांनी म्हाडासोबत करार केले आहेत. पहिल्या टप्प्यात ना.म जोशी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यायी जागा म्हणून ट्रान्झिट कॅम्पच्या जागेसाठी आता रहिवासी आणि म्हाडामध्ये करार सुरू झाले आहेत. बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या सुविधेसाठी म्हाडाने नोंदणी व मुद्रांक विभागाच्या मदतीने ऑन द स्पॉट नोंदणीची सुविधा देऊ केली आहे. आतापर्यंत ५५ जणांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. यानुसार थेट घराच्या दारात जावून हे करार केले जात आहेत.

ना.म जोशी येथील बीडीडी चाळीसाठी ८०० रहिवाशांपैकी ४५१ रहिवासी हे पुनर्विकास प्रकल्पासाठी आतापर्यंत पात्र ठरले आहेत. तर उर्वरीत ३४९ रहिवाशांची पात्रता निश्चिती लवकरच पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास म्हाडाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत एकूण ३२ चाळींपैकी ७ चाळींमधील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास कृती समितीच्या सूचनेनुसार आणि प्राधान्यक्रमानुसारच या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. रहिवाशांचे संपूर्ण सामान हे राहत्या ठिकाणापासून ते ट्रान्झिट कॅम्पपर्यंत तसेच पुन्हा मूळ ठिकाणी आणून देण्यासाठी म्हाडाकडून पॅकर्स अ‍ॅण्ड मुव्हर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या सगळ्या सुविधांसाठी रहिवाशांना म्हाडाकडून बल्क एसएमएसदेखील पाठविण्यात येणार आहेत.

- Advertisement -

ट्रान्झिट कॅम्पसाठीचा करार सरकार दरबारी नोंदवण्यासाठी आयजीआर विभागाने पॉज मशीनचा वापर करून नोंदणी करायला सुरूवात केली आहे. या करारासाठीचे ७०० रूपये नोंदणी शुल्क हे म्हाडामार्फत मोजण्यात येणार आहेत. या संपूर्ण पुनर्वसन प्रकल्पासाठी म्हाडाला १७ हजार ४४ कोटी रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील एन.एम जोशी बीडीडी चाळीसाठी म्हाडा स्वतः २४०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. तर उर्वरीत प्रकल्पांसाठी सदनिका विक्रीतून पैसे गुंतवण्याचा म्हाडाचा मानस आहे.

३० महिन्यांतच पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण
आगामी तीस महिन्यातच पहिल्या टप्प्यातील इमारत बांधणीचे काम पूर्ण करण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी एन.एम जोशी चाळीतील रहिवाशांना १ किलोमीटर ते २ किलोमीटर परिसरातच पर्यायी ट्रान्झिट कॅम्पमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. नजीकच्या गिरण्यांच्या जमिनीच्या जागेतील ट्रान्झिट कॅम्पमध्ये या रहिवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे. वरळी बीडीडी चाळीसाठी विकासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रहिवाशांच्या पात्रता सर्वेक्षणाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाठी मात्र आणखी काही कालावधी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -