घरमुंबईबेस्टची टिक टिक पुन्हा होणार बंद ....

बेस्टची टिक टिक पुन्हा होणार बंद ….

Subscribe

ट्रायमॅक्स मशीन्सच्या दुरुस्तीला ४ कोटीच्या खर्च ,पाच डेपोमध्ये मशीनचा वापर

बेस्टमधील कंडक्टरची टिक टिक आता पुन्हा बंद होणार आहे. बेस्ट प्रशासन पुन्हा ट्रायमॅक्स मशीन्सचा वापर सुरू केला आहे. काही महिन्यांपूर्वी ई-तिकीट यंत्रणा योग्य पद्धतीने चालत नसल्यामुळे उपक्रमावर सातत्याने टीका केली जात होती. परंतू, ई-तिकिटिंग पुरविणार्‍या ट्रायमॅक्स कंपनीने हा तांत्रिक बिघाड दूर केल्याने ट्रायमॅक्स मशीन्स नव्याने वापरात आणल्या जात आहेत. बेस्टच्या पाच डेपोंमध्ये कंडक्टरच्या हाती या ट्रायमॅक्स मशीन्स देण्यात आल्या आहेत. पुढे टप्याटप्प्याने या मशीन सर्व बेस्टच्या डेपोत वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे बेस्टचे कंडक्टर्सची पारंपरिक टिकटिकपासून आता सुटका होणार आहे.

मुंबईतील दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणार्‍या बेस्ट परिवहन सेवेत बंद पडलेली ई-तिकिटिंग यंत्रणा पुन्हा सज्ज होऊ लागली आहे. बेस्टच्या पाच डेपोंमध्ये ई-तिकीट देणार्‍या मशिन्स सुरू करण्यात आल्या असून नुकतेच वडाळा डेपोमध्ये वाहकांना या मशिन्स देण्यात आल्या आहेत. नादुरुस्त झालेल्या ट्रायमॅक्सच्या मशिन्समध्ये काही दुरुस्ती करून या मशिन्स पुन्हा वापरात आणलेल्या आहेत.बेस्टमध्ये २०१० सालापासून ई-तिकिटींग सुरु करण्यात आली. त्यासाठी ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅड सर्व्हिस कंपनीशी करार करण्यात आला होता. परंतु या या मशिनमध्ये बिघाड होण्यासह अनेक तक्रारी येत होत्या. परंतु बेस्टला इ-तिकिटींग पुरविण्यासाठी कोणत्याही कंपन्या पुढे न आल्याने ट्रायमॅक्सलाच पुन्हा कंत्राट देण्यात आले होते.

- Advertisement -

बेस्टमध्ये ९ हजार ५०८ मशिन्स आहेत. त्यापैकी जवळजवळ सर्वच मशिन्स नादुरुस्त असल्यामुळे त्यांचा वापर बंद करण्यात आला होता. मशिन्स बंद असल्यामुळे बेस्टचे लाखो करोड रुपयाचे महसूल बुडत होता. डेपोमध्ये या मशिन्स दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार गोराई, मजास, मागाठाणे, मालवणी आणि मरोळ डेपोमधील मशिन्स दुरुस्त करून पुन्हा वापरात आणल्या आहेत. तर वडाळा डेपोतील काही मशिन्स दुरुस्त करण्यात आल्या आहेत. सध्या लांबपल्ल्याच्या मार्गावर या मशिन्स वापरण्यात येत आहेत. नादुरुस्त मशिन्समधील चीप नवीन टाकण्यात आली असून बॉडी आणि कीपॅड बदलण्यात आले आहे. यासाठी एकूण ४ कोटीचा खर्च आला आहे, अशी माहिती बेस्टमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

१२२ कोटी नुकसान
बेस्टने २०१० मध्ये आपली कागदी तिकीट पद्धत बंद करत मशीनद्वारे तिकीट वितरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ट्रायमॅक्स कंपनीला यासाठीचे कंत्राट दिले होते. मात्र काही वर्षांपासून या यंत्रणेतील दोष समोर येऊ लागले. मशीन मध्येच बंद पडू लागल्या, अनेक तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे ट्रायमॅक्स मशिन वाहक आणि एकूणच बेस्टसाठी डोकेदुखी वाढत गेली. त्यांचा फटकासुद्धा बेस्टचा उत्पन्नावर पडला. या ट्रायमॅक्सने बेस्टचे १२२ कोटींचे नुकसान केले आहे. त्यामुळे ट्रायमॅक्सला हद्दपार करावे, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -