मुंबईकरांना बेस्टचे गिफ्ट; तिकीट झाले स्वस्त

बेस्ट बसचं किमान भाडे ८ रुपयांवरुन ५ रुपये करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त भाडे २० रुपये असणार आहे.

Best will reduce bus fare minimum bus fare 5rs in mumbai
संग्रहित छायाचित्र

बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास स्वस्त झाला आहे. कोट्यावधीच्या कर्जात आणि तोट्याच्या गाळात अडकलेल्या बेस्ट प्रशासनाने नवा उपक्रम हाती घेऊन मुंबईकरांसाठी सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. बेस्ट बसचं किमान भाडे ८ रुपयांवरुन ५ रुपये करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त भाडे २० रुपये असणार आहे. तर एसी बससाठी किमान भाडे ६ रुपये आणि जास्तीत जास्त भाडे २५ रुपये असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा बेस्ट बसचा प्रवास सुखकारक होणार आहे. ओला उबेरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परत बेस्टकडे खेचून आणण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे

असा असणार बेस्ट तिकीटाचा नवा दर

नव्या प्रस्तावानुसार, पाच किमीपर्यंतच्या प्रवासासाठी पाच रुपयांचे तिकीट असणार आहे. त्यानंतर १० किमीसाठी १० रुपये, १५ किमीपर्यंतच्या अंतरासाठी १५ रुपये आणि १५ किमीपुढील अंतरासाठी २० रुपये तिकीट दर असणार आहेत. तर, दैनिक पास ५० रुपयांना असणार आहे. तसंच एसी बसचे दरही कमी करण्यात आले आहेत. एसी बसचे तिकीट पाच किमीपर्यंतच्या अंतरासाठी ६ रुपये, १० किमीपर्यंतच्या अंतरासाठी १३ रुपये, १५ किमीपर्यंतच्या अंतरासाठी १९ रुपये आणि १५ किमीपुढील अंतरासाठी २५ रुपये तिकीट दर असतील. तर, दैनंदिन पास ६० रुपयांना असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.