घरमुंबईबेस्ट देणार वॉटर लॉगिंग अ‍ॅलर्ट

बेस्ट देणार वॉटर लॉगिंग अ‍ॅलर्ट

Subscribe

 प्रवाशांच्या सुविधेसाठी लवकरच अ‍ॅप

मुंबईत पावसाळ्यात साचणार्‍या पाण्यामुळे बेस्ट बसचे अनेकदा बस मार्ग वळवण्यात येतात. तसेच गणपती मिरवणूक, मोर्चा, रास्ता रोको, रस्ते अपघात यांसारख्या परिस्थितीतही बेस्ट बसेसचे मार्ग वळवण्यात येतात. प्रवाशांच्या सुविधेसाठीच बेस्ट उपक्रमाकडून यापुढे अशा विविध घटनांचे अ‍ॅलर्ट मुंबईकरांना मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.

मुंबईकर प्रवाशांच्या सुविधेसाठी आता बेस्ट उपक्रम मोबाईल अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करून देत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना बस येण्यासाठीचा अपेक्षित कालावधी (एक्सपेक्टेड टाईम ऑफ अरायव्हल) हा कळण्याची सुविधा मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी जेव्हा बस मार्गांमध्ये बदल करण्यात येतील, तेव्हा मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर पॉप अप अ‍ॅलर्ट देण्यात येतील, असे बेस्टचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी विक्टर नागावकर यांनी सांगितले. प्रवाशांच्या सुविधेसाठी हे अ‍ॅलर्ट देण्यातील येतील. त्यामुळे प्रवाशांना ईटीएसारख्या सुविधेसोबतच बस मार्गाबाबतची माहिती मिळणे शक्य होईल. सध्याच्या यंत्रणेत बेस्टच्या टोल फ्री क्रमांकावरच अशी माहिती मिळणे शक्य होते. तसेच ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्याची सुरूवात बेस्ट उपक्रमाने नुकतीच केली आहे. त्यामध्ये अ‍ॅलर्ट देणारी पॉप अपची सुविधा ही प्रवाशांच्या माहितीमध्ये भर घालणारी आहे.

- Advertisement -

अ‍ॅपच्या नावासाठी स्पर्धा
बेस्ट उपक्रमाकडून मोबाईल अ‍ॅपच्या नावासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बेस्ट बसेसच्या अ‍ॅपसाठी सर्वोत्कृष्ट नाव देणार्‍यासाठी उपक्रमाकडून रोख बक्षीसही देण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत बेस्ट उपक्रमाकडून बेस्ट बसच्या अ‍ॅपचे लाँचिंगही करण्यात येणार आहे. अ‍ॅपसाठी नाव देण्यासाठी आतापर्यंत उपक्रमाकडे ३०० मुंबईकरांनी ईमेलद्वारे बेस्ट उपक्रमाला नावे सुचवली आहेत. बेस्ट बस लाँचिंगच्या दिवशीच हे नाव आणि विजेताही घोषित करण्यात येईल.

मुंबई सिटी गाईड
मुंबई दर्शनासाठी येणार्‍या पर्यटकांसाठी मुंबईतील पर्यटन स्थळांची माहिती देणारे सिटी गाईडचे फीचरही अ‍ॅपमध्ये समाविष्ट केले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध स्थळांची माहिती अ‍ॅपवर देण्यात येणार आहे. मुंबईत पहिल्यांदा बेस्टने प्रवास करणार्‍यांसाठी बेस्ट बसचे मार्गही यामध्ये सुचवण्यात येणार आहेत. बस प्रवासामध्ये हरवलेल्या वस्तूंचीही माहिती अ‍ॅपवर मिळणार आहे.

- Advertisement -

तिकीट काढण्याचा पर्याय दुसर्‍या टप्प्यात
बेस्ट बस प्रवाशांसाठी सध्या पहिल्या टप्प्यात अ‍ॅपमध्ये ईटीएचा पर्याय देण्यात आला आहे. पण दुसर्‍या टप्प्यात अ‍ॅपमध्ये प्रवाशांना तिकीट काढण्यासाठीची सुविधा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात बेस्टकडून ईटीएवर अधिक भर देण्यात आला आहे. पण दुसर्‍या टप्प्याअंतर्गत मोबाईल अ‍ॅपमध्ये तिकीटासाठी पैसे रिफिल करण्यापासून ते तिकिट काढण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -