घरमुंबईमुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ खबर

मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ खबर

Subscribe

जुलैपासून नवे दर लागू ,वार्षिक १०० कोटींचे नुकसान

मुंबई महानगरपालिकेने आणलेल्या दबावामुळे बेस्टने तिकिट दरात कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतला असून दर कपातीच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंगळवारी झालेल्या सभेमध्ये मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पाच किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे पाच रुपये आकारण्यात येणार आहे. यापूर्वी किमान अंतरासाठी आठ रूपये मोजावे लागत होते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीशी या तिकीट दर कपातीचा काही संबंध नाही, असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केेले असले तरी या निर्णयाला निवडणुकीचीच किनार आहे, हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही. मुंबईकरांसाठी तिकीट दर कपात ही खुशखबर असली तरी तो बेस्टच्या गळीतील धोंडा तर ठरणार नाही ना, अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवारी तिकिट दर कमी करण्यासाठी महापालिकेत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बेस्टच्या नवीन तिकिट दरांची अंमलबजावणी करण्यात येईल. भाडे कपातीच्या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

आर्थिक गर्तेत सापडलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेने ६०० कोटींची मदत करून बेस्टला संजीवनी देण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र ही मदत करत असताना मुंबई महानगरपालिकाने बेस्ट प्रशासनाला काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. त्यानुसार बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाला देण्यात आले होते. हे बदल न झाल्यास अनुदानाचा हप्ता देण्यात येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार बेस्ट उपक्रमाने नवीन भाडेदराचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेमध्ये सादर करण्यात आला. त्यावर बेस्ट समितीच्या सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

त्यामुळे पुनर्विचार करण्यासाठी भाडे कपातीच्या प्रस्ताव परत पाठविण्यात आला होता. मात्र मंगळवारी बेस्ट समितीने या प्रस्तवाला अखेर मंजुरी दिली आहे. आता या नवीन प्रस्तावानुसार प्रौढ आणि लहान मुलांसाठी भाडेदर सारखेच आहेत. तसेच बेस्टने सामान्य बसेस व्यतिरिक्त एसी बसेसच्या किमान भाड्यातही कपात केलेली आहे. एसी बसचे किमान भाडे ६ रूपये करण्यात आले आहे. यापूर्वी एसी बससाठी १५ रूपयांचे किमान भाडे आकारण्यात येत होते.

- Advertisement -

आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बेस्टमध्ये
बेस्टचा भाडे कपातीचा ऐतिहासिक निर्णय झाल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच बेस्टच्या कुलाबा येथील इलेक्ट्रिक हाऊसला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आज केवळ बेस्ट ऑफ लक म्हणायलाच या ठिकाणी आलो आहोत. बेस्टचे भाडे कमी केल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यासाठी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, बेस्ट समिती अध्यक्ष, बेस्टचे महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्तांचे आभार मानतो तसेच त्यांचे अभिनंदन करतो.

वार्षिक १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान
मंगळवारी झालेल्या बेस्ट समिती सभेमध्ये बेस्टच्या भाडेकपातीवर बेस्ट समिती सदस्यांनी स्वागत केलेच, मात्र या प्रस्तावावर अनेक प्रश्न उपस्थित करून त्यात दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. या दरम्यान सुनील गणाचार्य यांनी सांगितले की, या भाडे कपातीमुळे बेस्ट प्रशासनाला प्रत्येक महिन्याला ९ ते १० कोटी तर वार्षिक 100 कोटी पेक्षा जास्त नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे बेस्टला आर्थिक फटका बसणार आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेनेही नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून बेस्टचे नुकसान होणार नाही.

बेस्टचे भाडे कमी केल्याबद्दल महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, बेस्ट समिती अध्यक्ष, बेस्टचे महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्तांचे आभार मानत अभिनंदन करतो की त्यांनी मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास किफायतशीर केला. आमचे काम बेस्ट कसे होईल याकडे आम्ही विशेष लक्ष देत असून राज्यात होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीची ही तयारी नाही तर आमचे काम असेच सतत सुरुच असणार आहे
– आदित्य ठाकरे , प्रमुख, युवा सेना

===================
असे असणार नवीन दर
=======================
कि मी साधी बस एसी बस
===================
५ ५ रु. ६ रु.
१० १० रु. १३ रु.
१५ १५ रु. १९ रु.
१५ + २० रु. २५ रु.

======================
अंतरावर आधारित बसपास
===============================
किमी साधी बस एसी बस
=====================================
मासिक त्रैमासिक मासिक त्रैमासिक
=====================================
५ २५० रु ७५० रु ३०० रु ९०० रु
१० ५०० रु १५०० रु ६५० रु १९५० रु
१५ ७५० रु २२५० रु ९५० रु २८५० रु
१५ + १००० रु ३००० रु १२५० रु ३७५० रु
=============================
विद्यार्थी बसपास दर
===================
इयत्ता मासिक त्रैमासिक अर्धवार्षिक
५वी पर्यत २०० रु ६०० रु १००० रु
६-१० वीपर्यंत २५० रु ७५० रु १२५० रु
११- १२ वीपर्यंत ३५० रु १०५० रु १७५० रु
=====================================

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -