बेस्टच्या भाडेकपातीचा टॅक्सी – रिक्षांना फटका

बेस्ट भाडेकपातीविरोधात रिक्षा-चालक आक्रमक

Mumbai
Rickshaw

मुंबई महानगरपालिका आणि बेस्टने ऐतिहासिक भाडे कपात करून मुंबईकरांना दिलासा दिला आहे. मात्र या निर्णयामुळे लाखो टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मागील एका आठवड्यातून परिणाम दिसून येत आहेत. यातील सर्वाधिक फटका शेअर टॅक्सी रिक्षाला बसला आहे. त्यामुळे शहरासह उपनगरांतील रिक्षा आणि टॅक्सी चालक- मालक चिंतेत आहेत. मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा बंद करण्याचा घाट मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकारकडून रचला जात आहे. सध्या आम्ही वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका टॅक्सी – रिक्षा चालक संघटनाकडून घेतली असून याविरोधात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई टॅक्सी मेन्स युनियनचे सरचिटणीस ए.एल.क्वाड्रोस यांनी ‘दैनिक आपल महानगर’ला दिली आहेत. त्यामुळे येत्या काळात पुन्हा टॅक्सी रिक्षा चालकांकडून संपाची घोषणा होऊ शकते.

सध्या मुंबई महानगर क्षेत्रात 50 हजार टॅक्सी तर 2 लाख 50 हजार रिक्षा आहेत. यामध्ये तीन हजार शेअर टॅक्सी तर चार हजारांपेक्षा जास्त शेअर रिक्षा आहेत. यांना बेस्ट भाडे कपातीचा सर्वाधिक फटका बसला आहे. बेस्ट भाडेकपात लागू झाली तेव्हापासून शेअर टॅक्सीचा व्यवसाय 1800 वरून 1100 रुपयावर आला आहे. तर शेअर रिक्षाच्या व्यवसाय 1300 वरुन 900 रूपयांची घसरण झाली आहे. मात्र मीटरवर धावणार्‍या टॅक्सी रिक्षावर परिणाम झालेला नाही. बेस्टकडे बसेसची संख्या कमी आहे. मात्र बेस्टच्या ताफ्यात लवकरच 400 एसी बसेस येणार आहेत. सोबतच बेस्टच्या बस गाड्यांची संख्या वाढविण्यावर बेस्ट प्रशासन आणि महानगर पालिका जोर देत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात मीटरवर धावणार्‍या टॅक्सी रिक्षाचे मिटर डाऊन होणार आहेत. त्यामुळे आतापासूनच महानगर पालिका आणि राज्य सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटना तयारीला लागल्या आहेत.

बेस्ट भाडेकपातीचा सर्वाधिक फटका शेअर टॅक्सी आणि रिक्षाला बसला आहेत. मात्र मीटरवर चालणार्‍या टॅक्सी आणि रिक्षांवर परिणाम झालेला नाही. मात्र आगामी काळात त्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने टॅक्सी- रिक्षा चालकांच्या भविष्याबाबत विचार करावा. अन्यथा मुंबई आणि उपनगरातील टॅक्सी- रिक्षा चालक रस्त्यावर उतरेल.                                                                                                  के.के. तिवारी,अध्यक्ष, स्वाभिमानी टॅक्सी- रिक्षा युनियन