घरमुंबईबेस्ट संपाने मुंबईकरांचे हाल

बेस्ट संपाने मुंबईकरांचे हाल

Subscribe

नव्या वर्षातील पहिल्याच आठवड्यात बेस्ट कामगारांनी पुकारलेल्या संपाची मुंबईकरांना चांगलीच झळ पोहचली. बस आगारांमध्ये उभ्या असलेल्या बसगाड्या, रेल्वे स्थानकांच्या बाहेर रिक्षा-टॅक्सी स्टॅण्ड येथे लागलेल्या लांबलचक रांगा, त्यामुळे रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक, ओला-उबर खासगी टॅक्सीला प्रचंड मागणी…आणि रेल्वे स्थानकांवर उसळलेली प्रचंड गर्दी अशा प्रकारे बेस्ट संपाच्या पाश्वर्र्भूमीवर मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. मात्र मंगळवारी दिवसभर या संपावर तोडगा निघालाच नाही. त्यामुळे बुधवारीही मुंबईकरांचे हाल होण्याचे चिन्ह आहेत.

मंगळवारी प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारला. त्यामुळे तब्बल २५ लाख मुंबईकरांची पंचाईत झाली. मुंबईकर आपल्या कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेल्यांना संपामुळे बस स्टॉपवर अडकून पडल्याचे दिसत होते. बेस्टच्या सांताक्रूझ, कुर्ला, गोरेगाव यांसारख्या मोठ्या डेपोंमध्ये बसगाड्यांची मोठी वर्दळ असते. या डेपोबाहेरील रस्ते कायम गजबजलेले असतात. परंतु संपामुळे बसगाड्या डेपोतच विसावल्या होत्या. बेस्ट कर्माचार्‍यांच्या संपामुळे मंगळवारी अनेक मुंबईकर वेळेत ऑफिसला पोहचू शकले नाही. तर शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देखील या संपाचा फटका बसला असून त्यांना वेळत जाता आले नाही. दरम्यान, या संपाचा फायदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना झाला. या संपामुळे बर्‍याच ठिकाणी प्रवाशांची लूट सुरु असून रिक्षा आणि टॅक्सी चालक अव्वाच्या सव्वा भाडे उकळत असल्याचे चित्र दिसून येत होते.

- Advertisement -

बेस्ट संपा फूट
बेस्ट कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांवर मनपा आयुक्त, बेस्ट महाव्यस्थापक आणि बेस्ट समिती अध्यक्ष यांच्या बरोबर मंगळवारी चर्चा झाली, मात्र ती निष्फळ ठरल्याने संप सुरु राहणार, असा पवित्रा बेस्ट कृती समितीने घेतला आहे, तर या बेस्ट संपात फूट पडण्याचे संकेत पहिल्याच दिवशी मिळाले. बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपातून बाहेर पडण्याचा बेस्ट कामगार सेनेने घेतला. तसे पत्र बेस्ट कामगार सेनेने बेस्ट प्रशासनाला दिले. बेस्ट प्रशासनाकडून याआधीच संपात सहभागी झालेल्यांविरोधात ’मेस्मा’ कायद्याखाली कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संपकरी कर्मचार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या कारवाईला न जुमता बेस्ट कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

बेस्ट संपामुळे रिक्षावाल्यांची बेसुमार भाडेवाढ
बेस्ट संपामुळे प्रवाशांना रिक्षा-टॅक्सीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. याचा फायदा घेत रिक्षा, टॅक्सी चालकांनी बेसुमार भाडेवाढ केली. कुर्ला पश्चिमेकडून बीकेसी, कुटुंब न्यायालयाकडे जाणारे शेअर रिक्षावाले 25 रुपयांऐवजी 40 रु. भाड्याची मागणी करताना दिसत होते. कुर्ला डेपोजवळ कालिनाला जाणार्‍या रिक्षांसाठीही प्रवाशांच्या लांबलचक रांगा दिसून येत होत्या. मुंबईकरांना पर्याय नसल्यामुळे काही प्रवाशी अतिरिक्त पैसे देऊन प्रवास करताना दिसून येत होते. मेट्रोच्या कामामुळे ट्रॅफिक जाम असल्याचे कारण देत अनेक रिक्षा चालक आणि टॅक्सीवाले मीटरपेक्षा जास्त भाड्याची मागणी करत होते. साधारण २ हजार रुपयाचा व्यवसाय करणारे रिक्षा चालकांनी मंगळवारी ४ हजारांपेक्षा जास्त धंदा केला.

- Advertisement -

रिक्षा स्टॅण्डवर पोलीस गस्त
गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि रिक्षाचालक आणि टॅक्सी स्टँडवर प्रवाशांमध्ये वाद उद्भवू नये म्हणून मुंबई पोलिस हस्तक्षेप करताना दिसत होते. अंधेरी, कुर्ला, सीएसएमटी, बोरिवली, मालाड आणि मरोळ सारख्या बेस्ट डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस गस्त होती. तर वांद्रे, दादर आणि कुर्ला सारख्या महत्व पूर्ण रेल्वे स्थानकांबाहेर प्रवासी आणि रिक्षा, टॅक्सी चालकांमध्ये वाद होऊ नये म्हणून पोलीस हस्तक्षेप करत होते. तर काही ठिकाणी बेस्ट कर्मचारी सुद्धा प्रवाशांना मार्गदर्शन करताना दिसून येत होते.

मुंबईकरांसाठी धावली एसटी
बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ आणि मध्य आणि पश्चिम रेल्वे धावून आली. सकाळपासून एसटीने 55 बस सुरू केल्या. कुर्ला पश्चिम ते बांद्रा – 5, कुर्ला पूर्व ते चेंबूर – 5, दादर ते मंत्रालय – 5, पनवेल ते मंत्रालय – 5, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय – 5 ठाणे ते मंत्रालय – 15 एकूण 55 बसगाड्या एसटीने सोडल्या आहेत, तर दुसरीकडे मध्य आणि पश्चिम रेल्वेने अतिरिक्त सेवा चालवल्या आहेत.

एकही बसगाडी डेपोबाहेर नाही
बेस्टचे आज सकाळी ७ वाजता हजेरीपत्रक पाहिले असता, बेस्ट कर्मचार्‍यांचा संप यशस्वी झाल्याचे समजते. बेस्टच्या २७ डेपोंमध्ये केवळ १ कंडक्टर (२२५९ पैकी), ९ ड्रायव्हर (२२०० पैकी), ५१ इन्स्पेक्टर (१८० पैकी) आणि फक्त १९ स्टार्टर (१८९ पैकी) सकाळी कामावर रुजू झाले होते. त्यामुळे १,८१२ पैकी एकही बेस्ट बस डेपोच्या बाहेर पडू शकली नाही. सुमारे ३० हजार बेस्ट कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत.

शांतता आणि नाराजी
मुंबईच्या कित्येक बसडेपोजवळही शांतताच होती. बेस्टचे काही कर्मचारी आज आमचा संप आहे, कृपया सहकार्य करा, असे आवाहन प्रवाशांना करतानाच गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त करत होते. कित्येक स्थानकांमधून जाण्यासाठी टॅक्सी मिळणेही अवघड झाले होते. त्यामुळे अनेकांनी पायीच घरी जाण्याचा पर्याय निवडला होता.

बेस्टच ३ कोटी पेक्षा जास्त नुकसान
बेस्ट संपामुळे बेस्टचे सरकारी एक दिवासत तीन कोटीचे नुकसान झाले आहेत. तर काही बेस्ट गाड्याचे नुकसान झाले आहेत. मंगळवारी मध्य रात्री एकूण बेस्टच्या १० बसेस फोडण्यात आल्या. राम मंदिर वडाळा, धारावी पी एम जी कॉलनी, मालाड पश्चिम, मागाठाणे टेलिफोन एक्सचेंज, पठाणवाडी मालाड, पवई गार्डन, कांदिवली स्विमिंग पूल, घाटकोपर कासोरिया सोसायटी आणि दादर टी टी सर्कल या परिसरात बसेस नुकसान करण्यात आले, यात एक जखमी झाला.

महापालिका आयुक्ताबरोबर आमची बैठक झाली. मात्र या बैठकीत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. बेस्ट उपक्रमाच्या ‘क’ अर्थसंकल्प मनपाच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत आयुक्तांनी नकार दिला आहे. बेस्ट समिती अकार्यक्षम आहे, त्यांची कार्यपद्धती बरोबर नाही, त्यामुळे बेस्ट अर्थसंकल्प विलीन होऊ शकत नाही, असे महापालिका आयुक्त म्हणाले आहेत. बेस्ट कमेटी शिवसेनेची आहे त्यांनाही कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. त्यांना बेस्ट संपत्ती विकून बंद पाडायची आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही.
– शशांक राव, सरचिटणीस, बेस्ट वर्कर्स युनियन

विद्युत विभागाला मोठ्या फटका
बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपामध्ये बेस्टच्या विद्युत विभागाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. या संपामध्ये ५० टक्के विद्युत विभागाच्या कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. उर्वरित ५० टक्के कर्मचारी कार्यालयात पोहचू शकले नाही. त्यामुळे बेस्टच्या विद्युत विभागाचे मोठे नुकसान झाले.

बेस्ट सेवा तोट्यात असतानाही संप करण्याचे काहीही कारण नव्हते. मुंबईकर बेस्टला आपली मानतात. त्यांनी संप पुकारून प्रवाशांचे हाल करणे योग्य नाही.
– रवि मंडनवार, दादर

संपामुळे खूप मनस्ताप झाला. लोकलमध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दीचा सामना करावा लागला. ओला, उबेरनेही जास्त दर आकारून सर्वसामान्यांचा खिसा कापला आहेत.
– मयुरी गोलीपकर, दादर

आज बेस्टचा संप असल्याकारणाने आमची तारांबळ उडालेली होती. कार्यालयात पोहोचण्यासाठी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण रिक्षासुद्धा थांबत नव्हती. प्रशासनाने लवकरात लवकर बेस्ट कर्मचार्‍यांच्या या संपावर तोडगा काढावा.
– जुईली घाडीगांवकर

ऑफिसला जाण्यासाठी लवकर घरातून निघालो. बस आली नाही. बराच वेळ रिक्षासाठी रांगेत उभे राहावे लागले. रिक्षा उशिरा मिळाल्याने ऑपिसमध्ये लेटमार्क लागला.
– नितीन लोखंडे – कुर्ला

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -