Friday, August 7, 2020
Mumbai
28.8 C
घर महामुंबई बेस्ट देणार डिजीटल तिकीट व्यवस्थेला प्रोत्साहन

बेस्ट देणार डिजीटल तिकीट व्यवस्थेला प्रोत्साहन

बेस्ट समितीचा सभेत प्रस्तावाला मंजुरी

Mumbai

रेल्वेच्या धर्तीवर आता बेेस्ट उपक्रमाकडून कागदविरहीत तिकिटांना चालना देण्याकरीता मोबाईल तिकीटींग यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी डिजीटल पेमेन्ट अ‍ॅपचा पर्याय बेस्ट उपक्रम उपलब्ध करून देणार आहे. यासंबंधी गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत सर्वानुमते प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

बेस्ट उपक्रमाकडून बेस्टने प्रवास करणार्‍या प्रवाशांना डिजीटल तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी वाहकांकडे इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्युइंग मशिन (ईटीआयएम) उपलब्ध करणार आहे. याबाबत रिडलर कंपनीकडून ट्रायमॅक्स कराराच्या कालावधीमध्ये मोबाईल तिकीट, बस पास देणे आणि त्याबाबतची पुनर्भरणा करणे याकरिता सर्व बसमार्गांवरील प्रवासी भाडे आधारित अ‍ॅप यापूर्वीच विकसित करण्यात आले आहे. मोबाईल तिकीटींगला सहाय्य पुरवण्यासाठी मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रत्यक्ष पास देण्यासाठी आणि मोबाईल पास जारी करण्यासाठी अ‍ॅप कार्यरत आहे.

सध्या बेस्ट उपक्रमामध्ये या माध्यमातून प्रतिवर्षी केवळ 115.50 लाख एवढा महसूल जमा करण्यात येत आहे. त्यामुळे यात मोबाईल तिकिटांचा अधिक लाभ विचारात घेता. यात आणखी वाढ करण्यासाठी आणि कागदविरहीत तिकिटांना चालना देण्याकरीता बेस्ट उपक्रमाची मोबाईल तिकीटींग यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे विचाराधीन होते. त्यामुळे पेटीएम, गुगल पे, मोबीविक इत्यादींसारख्या अन्य डिजीटल पेमेंट अ‍ॅप्लीकेशनचा पर्याय बेस्टकडून देण्यात येणार आहे. यातून प्रवाशांना क्रेडीट व डेबिट कार्ड, नेट बँकींग आणि प्रीपेड कार्डद्वारे तिकीटांचे पैसे अदा करता येतील. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले.

सुनील गणाचार्य यांची टिका
बेस्ट उप्रकमात पॉईंट टू पॉईट बस सेवा सुरु केली आहे. मात्र ही सेवा सुरु करत असताना बेस्ट समिती सदस्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप बेस्ट समितीचे वरिष्ठ सदस्य सुनिल गणाचार्य यांनी बेस्ट प्रशासनावर केला. तसेच विनावाहक बस सेवा योजनेमुळे प्रवासीच नव्हे तर वाहकांनाही मनस्ताप होत आहे. या बसगाड्यांचा मागील दरवाजा बंद करुन त्या चालवल्या जात आहेत. बसगाड्यांना एकच दरवाजा असणे, वाहक नसणे हे योग्य नसून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याची टिका त्यांनी केली. यामुळे विना तिकीट प्रवासीही वाढले असून बेस्टचा महसुलही बुडत आहे. त्याचा आढावा बेस्ट उपक्रमाने घ्यावा. तसेच यात अनेक त्रुटी असून विना वाहक बस सेवा चालवू नका, अशी मागणी गणाचार्य यांनी केली. तर बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी विना वाहक सेवेतील बसगाड्यांचे मागील दरवाजे बंद करुनच चालवत असल्याचे स्पष्ट केले. या सेवा देताना प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असे आश्वासन देतानाच सदस्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेत असल्याचे बागडे म्हणाले.

मिनी बसेसला उत्तम प्रतिसाद
बेस्ट उपक्रम आतापर्यंत 300 मिनी एसी बसेस चालवत आहे. फीडर सव्हिर्र्सचा माध्यातून या बसेसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दादर ते केईएम हॉस्पिटल या मार्गावर सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात येते कि, ज्या बस मार्गावर बस गाड्यांची कमतरता आहे. ते बेस्टच्या [email protected] या इमेल आयडीवर ईमेल पाठवू शकतात. बेस्ट परिवहन विभागाचे म्हणणे आहे की, एप्रिलपर्यंत 1200 नवीन बसगाड्या मिळणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार या नवीन बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.